-
इस्लामी कायदेही रहित करणार
-
सर्व नागरिकांना समान हक्क देणार
खार्तोम (सुदान) : आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडेकडील सुदान या इस्लामी राष्ट्रातील सरकारने देशातील ३० वर्षांची इस्लामी शासनव्यवस्था संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी तेथे आता धर्मनिरपेक्ष लोकशाही अंगीकारली जाणार आहे. येथे आता धर्म आणि सरकार यांच्यातील संबंध संपुष्टात आणण्यात येणार असून त्या आधारावरच नव्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता सुदानमध्ये सत्ताधारी हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसतील. सुदानमध्ये तब्बल ९८ टक्के लोकसंख्या इस्लामी आहे.
‘ब्लुमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानचे प्रधानमंत्री अब्दुल्ला हमदोक आणि ‘सुदान पीपल्स लिब्रेशन मुव्हमेंट-नॉर्थ’ या विरोधी गटाचे नेते अब्दुल-अजीज अल् हिलू यांनी या संदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षर्या केल्या आहेत. या घोषणापत्रामध्ये ‘सुदान यापुढे प्रजासत्ताक देश असेल. त्यासाठी येथील सर्व नागरिकांना समान हक्क देण्यात येतील, तसेच येथील राज्यघटना आणि धर्म यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसेल’, असे म्हटले आहे. आरंभी सरकारच्या या निर्णयास विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला; परंतु सरकारने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत त्यांचा विरोध मावळला. ‘सुदान पीपल्स लिब्रेशन मुव्हमेंट-नॉर्थ’च्या २ गटांपैकी एका गटाने धर्मनिरपेक्ष कार्यपद्धतीचा अवलंब न करणार्या करारांवर स्वाक्षर्या करण्यास नकार दिला आहे; मात्र मुख्य गटाने स्वाक्षर्या केल्याने सरकारसमोरील पेच काही प्रमाणात सुटला आहे.
सुदानमध्ये वर्ष १९८९ मध्ये हुकूमशाह उमर-अल् बाशीरने देशाची सत्ता कह्यात घेतली होती. त्यानंतर तेथे प्रचंड अशांतता निर्माण झाली होती. बशीरची सत्ता असतांना आतंकवादी संघटना अल् कायदा आणि कार्लोस यांचे सुदानमध्ये तळ होते. त्यामुळे वर्ष १९९३ मध्ये अमेरिकेने सुदानला आतंकवादाला पाठिंबा देणार्या देशांच्या सूचीत टाकले होते. याच कारणामुळे वर्ष २०१७ मध्ये अमेरिकेने सुदानवर कठोर निर्बंधही लादले. आता हे निर्बंध उठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात