पुरातत्व विभागाकडून अवशेषांचे निरीक्षण
काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे औरंगजेबने ज्ञानवापी मशीद बांधली हा इतिहास आहे आणि त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सरकारने आणि न्यायालयानेही हे पुरावे लक्षात घेऊन मंदिराची मूळ जागा हिंदूंना द्यावी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) : येथे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीजवळ करण्यात येत असलेल्या खोदकामाच्या वेळी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष १५ व्या किंवा १६ व्या शतकातील असल्याचे म्हटले जात आहे. मोगल बादशाह औरंगजेब याच्या आदेशाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली होती. याच मंदिराचे हे अवशेष असल्याचे म्हटले जात आहे. २ वर्षांपूर्वीही ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वेकडील भागातील प्राचीन भिंत हटवतांना अवशेष मिळाले होते. आता पुन्हा अवशेष मिळल्यामुळे पुन्हा एकदा काशी आणि मथुरा येथील मंदिरे मुसलमानांच्या कह्यातून मुक्त करण्याच्या मागणीला बळ मिळाले आहे.
( सौजन्य: झी न्यूज )
१. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष योजना असलेल्या महामार्गाचे काम चालू असतांना जेसीबीच्या साहाय्याने हे खोदकाम करण्यात येत होते. तेव्हा हे अवशेष सापडले. यानंतर येथील खोदकाम थांबवण्यात आले. येथे एक भुयारही दिसून आले आहे; मात्र याची पडताळणी केल्याखेरीज ते भुयार आहे कि अन्य काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अवशेष सापडल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी येथे आले आणि त्यांनी अवशेष कह्यात घेतले. तसेच त्यांनी या जागेची छायाचित्रेही काढली. त्यांनी याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला; मात्र त्यांनी ‘या अवशेषांचा अहवाल मंदिर प्रशासनाला देण्यात येईल’, असे सांगितले. यात क्षेत्रीय अधिकारी सुभाष यादव आणि बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे माजी प्राध्यपक मारुति तिवारी यांचा समावेश होता.
२. हे खोदकाम मंदिर परिसरातील श्रृंगार गौरी येथील अपारनाथ मठाजवळ चालू असतांना अवशेष सापडले. सापडलेल्या अवशेषांवर कलाकारी करण्यात आली आहे. त्यामध्ये कलश आणि कमळाचे फूल दिसून आले आहे. याविषयी मंदिर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
काशी विश्वनाथ मंदिराचा इदिहास
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे काशी विश्वनाथ मंदिर अनादि काळापासून येथे आहे. हे स्थान शिव आणि पार्वती यांचे आदि स्थान असल्याने याला आदिलिंग म्हणून पहिले लिंग मानले आहे. याचा उल्लेख उपनिषद आणि महाभारत यांमध्ये आहे. ख्रिस्तपूर्व ११ व्या शतकात राजा हरिशचंद्र याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. नंतर सम्राट विक्रमादित्यने त्याच्या काळात जीर्णोद्धार केला होता. वर्ष ११९४ मध्ये महंमद घोरी याने हे मंदिर लुटल्यानंतर पाडले होते. त्यानंतर याला पुन्हा बांधण्यात आले. वर्ष १४४७ मध्ये जौनपूरचा सुलतान महमूद शाह याने पुन्हा तोडले होते. १८ एप्रिल १६६९ या दिवशी औरंगजेब याने आदेश देऊन मंदिर पुन्हा पाडले आणि तेथे ज्ञानवापी मशीद बांधली. औरंगजेब याने दिलेल्या आदेशाची मूळ प्रत कोलकाता येथील एशियाटिक लायब्रेरीमध्ये आहे. याच वेळी औरंगजेबच्या आदेशाने काशीतील सहस्रो ब्राह्मणांना मुसलमान बनवण्यात आले. आज उत्तरप्रदेशातील ९० टक्के मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण असल्याचे म्हटले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात