माणसाला एकदा का गर्व झाला की, त्याचा प्रवास उलट दिशेने चालू होतो. त्याचे अधःपतन होते आणि शेवटी तो स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरतो. असे काहीसे चीनचे झाले आहे. गेल्या अनेक दशकांपासून चीन भारतावर कुरघोड्या करत आहे. डोकलामच्या घटनेपासून तर तो उघडउघडच कुरघोड्या करत आहे. त्याची ‘जेथे दृष्टी जाईल, ती भूमी आमची’, अशी आसुरी विस्तारवादी मानसिकता बनली आहे. या मानसिकतेचा त्रास आज केवळ भौगोलिकदृष्ट्या चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारतासारख्या देशालाच नव्हे, तर ज्यांचा भौगोलिकदृष्ट्या चीनशी काडीमात्र संबंध नाही, अशा देशांनाही होतो आहे. त्यांच्या भूमीवरही चीनकडून दावा सांगितला जात आहे. केवळ धनशक्तीच्या जोरावर चालू असलेल्या या त्याच्या दादागिरीच्या विरोधात आता अनेक राष्ट्रे एकवटली आहेत. चीनने भारताशी उकरून काढलेला सीमावाद हा दोन्ही देशांमधील तणावाचे मुख्य कारण आहे.
चीन हा नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका अशा भारताच्या शेजारी छोट्या छोट्या राष्ट्रांना हाताशी धरून त्यांना भारताच्या विरोधात उभे करत आहे. त्यामुळे देशासमोरील या संकटाची व्याप्ती मोठी आणि तितकीच गंभीर आहे. चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वर्तमानपत्रामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात ‘सध्या चालू असलेल्या सीमावादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही. आजच्या घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. चीन शक्तीशाली असल्याची आठवण आम्ही भारताला करून देत आहोत’, अशी दर्पोक्ती केली. हाच चीनचा गर्व आहे. त्यामुळे आपल्यालाही चीनला हे ठणकावून सांगावे लागेल आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे लागेल की, हा आता वर्ष १९६२ मधील भारत राहिलेला नाही. चीनकडे भारताच्या तुलनेत पैसा, सैन्यशक्ती आणि आधुनिक शस्त्रास्त्रे जरी अधिक असली, तरी भारतीय सैनिकांप्रमाणे लढाऊ वृत्ती आहे कुठे ? याची प्रचीती भारताने चीनला गलवान खोर्यात नुकतीच दिली आहे. युद्ध सैन्यशक्तीच्या आधारावर नव्हे, तर मनोबळावर लढले जाते. यासंदर्भात भारतीय सैनिक चीनपेक्षा कित्येक पटींनी सरस आहेत, हे भारताने सिद्ध केले आहे. तैवानसारखा छोटासा देशही संपूर्ण शक्ती एकवटून बलाढ्य चीनच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो. चीनचा विस्तारवाद, हेकेखोरपणा, बेभरवशी आणि विश्वासघातकी वृत्ती यांमुळे भारत, अमेरिका, थायलंड यांसारख्या अनेक राष्ट्रांनी चीनशी असलेले व्यावसायिक करार रहित केले आहेत. युद्ध हे केवळ भूमीवर आणि शस्त्रांच्या जोरावर लढले जाते, या भ्रमात असलेल्या चीनला आता आर्थिक युद्धाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्याचा तिळपापड झाला असून त्यातूनच तो वरीलप्रमाणे धमक्या देत आहे. त्यामुळे भारताने आता चीनला प्रत्युत्तर म्हणून आहे त्यापेक्षा अधिक कठोर धोरण अवलंबवावे आणि चिनी मालावर संपूर्ण बंदी घालावी, तसेच शक्य त्या मार्गांनी या राक्षसाचा नायनाट करावा, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात