रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचा ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी : सद्यःस्थितीत महिलांवर अत्याचार वाढत आहेत. यासाठी महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे. याचसमवेत महिलांनी साधना करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करावे. याद्वारे महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यात ३ सप्टेंबर या दिवशी महिलांसाठी शौर्यजागृती व्याख्यानाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. याला ३०० हून अधिक महिला धर्मप्रेमींनी सहभाग घेत चांगला प्रतिसाद दिला. या वेळी समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
श्री. सुमित सागवेकर यांनी स्वरक्षणासाठी आत्मबळाचे महत्त्व सांगतांना ‘श्री बगलामुखीदेवी, श्री प्रत्यंगिरादेवी, श्री महाकाली, श्री तनोटमाता आदी देवींची उदाहरणे देत प्रत्येक स्त्रीने शौर्याची उपासना, साधना आणि त्यांचे सामर्थ्य अंगीकारणे आवश्यक आहे’, असे सांगितले. या व्याख्यानात महिलांना स्वरक्षणाची काही प्रात्यक्षिके ‘ऑनलाईन’ दाखवण्यात आली. व्याख्यानाचा उद्देश कु. नयना दळवी हिने मांडला, तर सूत्रसंचालन कु. दिव्या घाग हिने केले. या वेळी उपस्थित महिलांनी ‘आम्ही सर्वजण स्वरक्षण प्रशिक्षण शिकणार’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात