सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची ‘गोवा आर्.टी.आय. फोरम’ची शासनाकडे तक्रार
- माहिती अधिकार कार्यकर्त्यांना तक्रार का करावी लागते ?
- प्रशासनाला अनधिकृतपणे बांधकाम चालू असल्याचे लक्षात का येत नाही ?
पणजी : मिरामार समुद्रकिनार्याजवळ सेंट अॅनी चर्चचे अनधिकृतपणे विस्तारीकरण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. या धार्मिक स्थळाच्या विस्तारीकरणाचे बांधकाम बंद पाडून ते धार्मिक स्थळ अन्यत्र हालवावे, अशी मागणी ‘गोवा आर्.टी.आय. फोरम’ने (माहिती अधिकार कार्यकर्त्यांची संघटना) राज्याचे मुख्य सचिव, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पणजी महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी अनधिकृतपणे विस्तारीकरण करण्याचे काम बंद पाडणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती ‘गोवा आर्.टी.आय. फोरम’च्या पदाधिकार्यांनी दिली.
‘गोवा आर्.टी.आय. फोरम’च्या पदाधिकार्यांनी पुढे सांगितले की, मिरामार समुद्रकिनार्याजवळ सेंट अॅनी चर्च येथे काँक्रीट मिक्सर, आदी यंत्रसामग्री आणून जोमाने पक्के बांधकाम करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या बाजूला धार्मिक स्थळे बांधता येत नाहीत. रस्त्याच्या बाजूला धार्मिक स्थळे उभारल्याने त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होते आणि यामुळे रस्त्याच्या बाजूला चालणारे पादचारी अन् वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ‘गोवा आर्.टी.आय. फोरम’ कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व धर्मियांना समान लागू झाला पाहिजे. रस्त्यावरील धार्मिक स्थळांना अनुसरून शासनाने यापूर्वी गट सिद्ध केला आहे. या गटाच्या माध्यमातून शासनाने रस्त्याच्या बाजूला असलेली धार्मिक स्थळे अन्यत्र हालवावी. ताळगाव मतदारसंघात रस्त्याच्या बाजूची धार्मिक स्थळे अन्यत्र हालवण्यात आली आहेत, असाच प्रयत्न पणजी मतदारसंघातही केला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात