शिक्षक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
देहली : ज्या देशांमध्ये शिक्षक-विद्यार्थी संबंधांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तेथे शिक्षक केवळ निमित्तमात्र राहिले आहेत. तेथील शिक्षक स्वत:साठी ५ डॉलर्सची अपेक्षा ठेवणारे आणि विद्यार्थी केवळ शिक्षकांचे व्याख्यान त्यांच्या मेंदूमध्ये भरून घेणारे झाले आहेत. भारतभूमीला प्राचीन शिक्षणव्यवस्थेची अनमोल देणगी आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला पुन्हा प्राचीन शिक्षणपद्धतीकडे वळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे प्रसारण फेसबूक आणि यूट्यूब यांच्या माध्यमांतून करण्यात आले. या व्याख्यानाचा लाभ ९ सहस्र १६२ जिज्ञासूंनी लाभ घेतला.
सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले की,
१. भारताला विश्वगुरु करण्यासाठी आपल्याला स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, पंडित मदनमोहन मालवीय, विदेशी विदुषी डॉ. अॅनी बेझंट यांच्या शिक्षणविषयक विचारांकडे लक्ष दिले पाहिजे.
२. स्वामी विवेकानंद यांच्या मते, शिक्षकांनी त्याग, साहस, उत्साह आदी गुणांनी परिपूर्ण असावे आणि विद्यार्थी हे शिक्षकांप्रती श्रद्धा, नम्रता, समर्पण अन् सन्मानाची भावना ठेवणारे असावेत. असे शिक्षक आणि विद्यार्थी असतील, तर सर्वांगीण विकास शक्य आहे.
३. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि चारित्र्यवृद्धी झाली पाहिजे. सर्वप्रथम आपल्या युवकांना बलवान केले पाहिजे. चारित्र्यवान नागरिक निर्माण करू शकणार्या शिक्षणालाच आपण उच्च शिक्षण म्हणू शकतो. कोणत्याही राष्ट्राचा विकास आणि त्याची सुरक्षा त्याच्या चारित्र्यवान नागरिकांवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांमध्ये उच्च चारित्र्याची निर्मिती करणे, हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.
४. संघर्षमय जीवनाची जडणघडण विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी सिद्ध करते; म्हणून भावी पिढीसाठी संघर्षाच्या सिद्धतेसमवेत तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता आहे. या तांत्रिक शिक्षणामुळे त्यांना नोकरीऐवजी स्वत:चे जिविकोपार्जन करता येईल.