Menu Close

‘संत तुकाराम बीडी’ या उत्पादनावरील ‘संत तुकाराम’ हे नाव तातडीने काढावे !

महाराष्ट्र वारकरी महामंडळ आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

चिपळूण : गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदायाची अस्मिता, कळसस्थान आणि महाराष्ट्राचे आराध्यस्थान असणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाने बिडी उत्पादन करण्याचे दुष्कृत्य आंध्रप्रदेश राज्यातील निजामाबाद येथे चालू आहे. त्यामुळे देशातील समस्त नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘संत तुकाराम बिडी’ आणि ‘संभाजी बिडी’ या नावाने चालू असलेली उत्पादने तात्काळ बंद करण्यात यावीत अन्यथा महाराष्ट्र वारकरी महामंडळ तीव्र आंदोलन करील, अशी चेतावणी वारकरी महामंडळाच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. हे निवेदन चिपळूण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना देण्यात आले.

निवेदन देते वेळी वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, वारकरी महामंडळाचे कोकण प्रांत अध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. बारकु महाराज जावळे, ह.भ.प. दत्ताराम महाराज आयरे, वारकरी महामंडळाचे खेड तालुका अध्यक्ष ह.भ.प. शैलेश महाराज आंब्रे, चिपळूण तालुका अध्यक्ष शांताराम महाराज नवेले, श्री. सुनील जावळे आणि हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे उपस्थित होते.

वारकरी संप्रदायातील विविध संघटनांनी आस्थापनाविरोधात निवेदने आणि तक्रारी दिल्या !

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडी उत्पादन करणार्‍या आस्थापनाने नाव पालटणार असल्याचे नुकतेच घोषित केले. संत तुकाराम महाराज यांच्या नावेही बिडी उत्पादन विक्री करणार्‍या आस्थापनांच्या विरोधात समस्त वारकरी संप्रदायाने निषेध नोंदवत आस्थापनाविरोधात निवेदने आणि तक्रारी दिल्या आहेत. याचे यश म्हणून संबंधित आस्थापनांच्या मालकांनी संत तुकाराम महाराज यांचे नाव आणि चित्र हटवणार असल्याचे आश्‍वासन दिले. समस्त वारकरी संप्रदायाने ‘राष्ट्रपुरुष, संत परंपरा यांच्यासंदर्भात कोणतेही अवमानास्पद कृत्य केल्यास त्याला आम्ही विरोध करू’, असे सांगितले आहे. परभणी येथील राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. खोकले महाराज यांना गंगाखेड तालुक्यात अशा प्रकारे बिडीची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संपूर्ण वारकरी संप्रदायापर्यंत हा विषय पोचला. सर्व वारकरी संप्रदायातील संघटनांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये निवेदने दिली, तक्रारी दिल्या. त्यानंतर बिडी उत्पादक प्रकाश पटेल यांनी बिडीचे नाव पालटणार असल्याचे आश्‍वासन दिले. राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय समन्वयक ह.भ.प. अरूण महाराज पिंपळे, राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, राष्ट्रीय संपर्कप्रमुख ह.भ.प. एकनाथ महाराज पठाडे, परभणी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. आकाश महाराज खोकले हे निवेदन देतांना सहभागी झाले.

यासंदर्भात राष्ट्रीय वारकरी परिषद, महाराष्ट्र तथा सर्व महाराष्ट्रातील संघटनांकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.

१. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि अन्य महापुरुष यांच्या नावाने चालू असलेल्या मादक पदार्थावर बंदी घालावी.
२. हे पदार्थ ज्या ठिकाणी निर्माण होतात, अशा आस्थापनांवर बंदी घालावी आणि आस्थापनाच्या मालकावर गुन्हा नोंद करावा.
३. अशा पदार्थांना अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवरही गुन्हा नोंद केला जावा.

(सौजन्य : News 1 Maharashtra)

संत तुकाराम महाराज यांच्या नावाने बिडी विक्री करणार्‍यांविरोधात आळंदी येथे तक्रार

समाजाला निर्व्यसनी करणार्‍या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावे व्यसनी पदार्थ विकणे, हा भयंकर अपराध ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

संपूर्ण विश्‍वाला विश्‍वशांतीचा महान संदेश आणि तत्त्वज्ञान सांगणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या नावाने बिडी उत्पादन होत आहे. हे उत्पादन गावोगावी बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. यामुळे आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या भावनेला तडा जात आहे. ज्या संतानी विश्‍वाला सामाजिक संदेश दिला, समाजाला निर्व्यसनी केले, त्यांच्या नावाने असे व्यसनी पदार्थ विकणे, हा भयंकर अपराध आहे. या बिडीवर तुकोबाराय यांचे छायाचित्रही छापले आहे. त्यामुळे या उत्पादकावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आळंदी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चवधर यांच्याकडे तक्रार दिली.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही निवेदन !

महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष ह.भ.प. कृष्णाजी महाराज रांजणे आणि इतर वारकरी मंडळी यांनीही या संदर्भात आवाज उठवत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले. ‘राष्ट्रसंत असलेले संत तुकाराम महाराज यांच्या नावे असे उत्पादन विक्री करणे, हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अवमान आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे असणारी आस्थापने मोठ्या प्रमाणात मराठवाडा भागात बिडीची विक्री करत आहेत. निवेदन दिल्यानंतर त्यांनी नाव हटवण्याचे आश्‍वासनही दिले आहे’, अशी प्रतिक्रिया हभप कृष्णाजी महाराज रांजणे यांनी दिली.

परळी येथे तहसीलदार यांना निवेदन देतांना वारकरी महामंडळाचे पदाधिकारी

संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांकडूनही समज !

संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. विक्रमसिंह महाराज मोरे यांनी बिडी उत्पादक प्रकाश पटेल यांना भ्रमणभाषवरून संपर्क केला. त्यांनी प्रकाश पटेल यांना योग्य ती समज देऊन संत तुकाराम महाराजांच्या नावाने बिडी विकण्यापासून परावृत्त केले. प्रकाश पटेल यांनी काही दिवसांच्या अवधीतच बिडीचे नाव पालटणार असल्याचे सांगितले.

बीड आणि नांदेड जिल्ह्यातही निवेदन

बीड येथील परळी तालुक्याचे तहसीलदार यांनाही महाराष्ट्र वारकरी मंडळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे, ह.भ.प. सचिन महाराज गीते, परळी तालुका येथील ह.भ.प. केशव महाराज गीते, ह.भ.प. राम महाराज मुंडे हे उपस्थित होते. अखिल वारकरी संघाच्या वतीने मुखेड (जिल्हा नांदेड) येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतांना राष्ट्रीय सचिव ह.भ.प. संजय महाराज हिवराळे, मराठवाडा अध्यक्ष निरंजन भाईजी महाराज यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *