नवी देहली : योगगुरू स्वामी रामदेवबाबा आता नवी दिल्लीच्या आसपास योग, वैदिक आणि संस्कृत विद्यापीठ स्थापन करणार आहेत. यासाठी त्यांना दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशात किंवा हरियाणातील भाजप सरकारकडून ५०० एकर जागा हवी आहे. रामदेवबाबांच्या निकटवर्तीय सूत्राने ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विद्यापीठात प्राचीन वैदिक शिक्षणाच्या विविध शाखांसह योग आणि आयुर्वेदाचे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. रामदेवबाबा हॉवर्ड आणि केंब्रिजच्या पातळीवरील जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करू इच्छितात. केंद्रात आणि राज्यांत मैत्रीपूर्ण सरकारे असल्यामुळे रामदेवबाबांची पतंजली आश्रमाच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात फूड पार्कस्ही उभारण्याची इच्छा आहे. त्यांच्या काही आयुर्वेदिक उत्पादनांनी व खाद्यवस्तूंनी यापूर्वीच काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मात दिली आहे. देशाच्या राजधानीत दिल्ली विकास प्राधिकरणाकडून (डीडीए) शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांना अत्यंत कमी दराने जमीन दिली जाते. भाजप आणि संघ परिवाराचा वैदिक शिक्षण आणि योगाला चालना देण्याबाबत कटाक्ष असतो. या पार्श्वभूमीवर सरकार उच्च पातळीवर रामदेवबाबांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करीत आहे.
स्त्रोत : लोकमत