कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील मंड्या येथील गुत्तलू भागात असणार्या अर्केश्वर स्वामी मंदिर परिसरामध्ये ३ पुजार्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. हे तिघेही झोपेत असतांना त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासानंतर म्हटले जात आहे. येथे मंदिराच्या फोडण्यात आलेल्या दानपेट्या सापडल्या आहेत. त्यातील नाणी वगळता नोटा चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. चोरट्यांची संख्या ३ पेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी श्वानपथकाचे साहाय्य घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
हे मंदिर मुख्य शहरापासून लांब आहे. त्यामुळे चोरट्यांनी या मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. मंदिरांच्या पुजार्यांपैकी एक असणारे गिरीश यांनी सांगितले की, यापूर्वी कधीही मंदिरात चोरीची घटना घडलेली नाही. चोरटे किती होते हे समजलेले नाही. आम्ही सकाळी ६ वाजता मंदिरात आलो, तेव्हा ही घटना निदर्शनास आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात