सर्वत्रच्या हिंदूंचे अस्तित्व आज धोक्यात आहे. मग ते भारतातील असोत किंवा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील असोत. भारत हिंदूबहुल देश असूनही येथील हिंदूंची आज दुर्दैवाने अल्पसंख्यांकांच्या दिशेने वाटचाल होत आहे. असे असतांना अन्य देशातील अल्पसंख्यांकांची स्थिती किती दयनीय असेल ? बांगलादेशमध्ये ३१ ऑगस्ट या दिवशी सहस्रो धर्मांधांनी श्यामल हलदार या हिंदूच्या घरावर आक्रमण केले. का ? तर म्हणे हलदार यांचा मुलगा श्रावण याने त्याच्या ‘मेसेंजर चॅट ग्रुप’मध्ये इस्लामचा अवमान केला. आक्रमण करून सोन्याचे १० दागिने, १५ लाख रुपये, फर्निचर, भांडी, तसेच भूमीची कागदपत्रे लुटली. श्रावण सध्या पोलिसांच्या कह्यात आहे. ‘धर्मांधांचा जमाव मोठा असल्याने आम्ही काही करू शकलो नाही’, अशी नेहमीची बुळबुळीत उत्तरे तेथील पोलिसांनी दिली. अद्याप आक्रमणकर्त्यांवर कारवाई झालेली नाही. यातूनच धर्मांध आणि पोलीस यांचे लागेबांधे उघड होतात. ही केवळ प्रातिनिधीक घटना आहे. आज बांगलादेशातील हिंदू जात्यात असल्याने भरडले जात आहेत आणि भारतातील हिंदू सुपात आहेत, हे वास्तव आहे. ते नाकारून चालणार नाही. भारतात जर अल्पसंख्यांकांवर आक्रमण झाले, तर तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले, मानवाधिकारवाले किंवा निधर्मी यांच्याकडून असहिष्णुतेच्या नावाने गळा काढला जातो. ‘आम्ही असुरक्षित आहोत’, असा दिंडोरा पिटला जातो; पण ज्या वेळी बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर आक्रमण होते, तेव्हा हे तथाकथित विचारवंत मात्र त्याविषयी अवाक्षरही काढत नाहीत. श्यामल हलदार यांच्या घरावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण करूनही एकाही प्रसारमाध्यमाने या घटनेला वाचा फोडली नाही किंवा एकाही वृत्तपत्राने या घटनेची किमान नोंद घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. आज भारतातील सामाजिक प्रसारमाध्यमे काय किंवा वृत्तवाहिन्या काय, सर्वच जण सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत, राफेल, कोरोना याच विषयांमध्ये रममाण झाली आहेत. या सर्व गदारोळात हिंदूंच्या व्यथा ऐकायला वेळ आहे कुणाला ? काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा अपवाद वगळता तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात हिंदूंवरील अत्याचार ऐकणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे कुणीही नाही, ही मोठी शोकांतिकाच आहे.
हिंदूंना संपवण्याचे कारस्थान !
मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये प्राचीन मंदिरांची तोडफोड केली जाते, सणांच्या दिवशी दंगली घडवल्या जातात. ‘आक्रमण होईल कि काय’, अशी भीती हिंदूंच्या मनात असते. त्यामुळे अल्पसंख्य हिंदू सतत मृत्यूच्या भयसावटाखाली जगत आहेत. बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रसंगी ढाल होऊन कार्य करणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष यांच्यावरही काही वर्षांपूर्वी धर्मांधांनी आक्रमण केले होते. तेथे सातत्याने हिंदूंचे दमन केले जाते. हिंदूंच्या पूजेत वापरल्या जाणार्या कमंडलूच्या आकाराची प्लास्टिकची भांडी मुसलमान शौचालयात वापरतात. यातूनच तेथील मुसलमानांमध्ये हिंदुद्वेष किती भिनला आहे, हे लक्षात येते. मुसलमानांच्या हिंदुविरोधी मानसिकतेला सातत्याने सामोरे जावे लागणे आणि असुरक्षित वातावरण यांमुळे भारतीय हिंदू तर बांगलादेशमध्ये जाण्याचे धाडसच करत नाहीत. संपूर्ण परिस्थितीचा परिणाम म्हणून तेथील हिंदूंची संख्या झपाट्याने न्यून होत आहे. वर्ष १९७२ मध्ये १६ टक्के असणारी हिंदूंची लोकसंख्या सध्या केवळ ९ टक्केच आहे. सरकार हिंदूंचे रक्षण करत नसल्याने हिंदूंना प्रतिदिन नरकयातनाच भोगाव्या लागत आहेत. बरे, या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवणार्यांचाच आवाज दडपला जातो. मागील वर्षी ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती एकता परिषदे’च्या संघटनमंत्री प्रिया साहा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बांगलादेशातील हिंंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी सांगितले. यात त्यांचे चुकले कुठे ? पण हिंदुद्वेषी शक्तींना हे सहनच झाले नाही. त्यामुळे बांगलादेशाच्या मंत्र्यांनी साहा यांच्यावर देशद्रोही खटला चालवण्याचा निर्णय घेतला. हिंदूंना न्याय देऊ पहाणारा आवाजच लुप्त व्हायला हवा, यासाठी हे खटलारूपी षड्यंत्रच रचले गेले. आज कोरोना महामारीच्या काळातही बांगलादेश प्रशासनाकडून हिंदूंना हीन दर्जाची वागणूकच दिली जात आहे. या सर्व घटनांतून लक्षात येते की, बांगलादेशमध्ये धर्मांधांना हिंदू नकोच आहेत. त्यामुळे हिंदूंचे अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न या ना त्या प्रकारे त्यांच्याकडून केला जात आहे. याला वेळीच वेसण घालण्यासाठी बांगलादेशचा खरा तोंडवळा सर्वांसमोर आणायला हवा.
काँग्रेस उत्तरदायी !
स्वातंत्र्याच्या काळात नेहरू आणि गांधी यांनी ‘भारताचे विभाजन होऊ देणार नाही’, असे आश्वासन दिले होते; पण ते हवेतच विरून गेले; कारण सरतेशेवटी भारताची फाळणी झालीच. त्यामुळे तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि आक्रमणे यांसाठी सर्वस्वी काँग्रेसलाच उत्तरदायी धरले पाहिजे. आजवरच्या इतिहासाचे स्मरण ठेवून त्याच्या पाऊलखुणांमधून सर्वांनीच बोध घ्यायला हवा. सद्यःस्थितीत बांगलादेशमधील विदारक वास्तव लक्षात घेऊन आता तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतानेच पावले उचलणे क्रमप्राप्त आहे. भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करून बांगलादेशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना एकप्रकारे दिलासा दिला आहे; मात्र या कायद्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, हे हिंदूंना अपेक्षित आहे. बांगलादेश सरकारवर दबाव आणून हिंदूंच्या मानवी अधिकारांची होणारी पायमल्ली रोखायला हवी. बांगलादेशी धर्मांधांना वेळीच निष्प्रभ करायला हवे. हे सर्व असे घडले, तर आणि तरच बांगलादेशमधील हिंदू खर्या अर्थाने सन्मानाने अन् सुरक्षित जीवन जगू शकतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात