‘चर्चा हिंदु राष्ट्राची !’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘फेसबूकचा पक्षपात : हिंदूंचे ‘पेज’ (पृष्ठ) बंद, आतंकवाद्यांचे चालू !’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र
पुणे : फेसबूकवर सध्या भारतविरोधी, तसेच हिंदु धर्माविरोधात द्वेषाचे वातावरण पसरवणार्या अनेक देशद्रोह्यांची खाती चालू आहेत. जिहादी आतंकवादाशी संबंध असलेले डॉ. झाकीर नाईक, हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे ‘एम्.आय्.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी, ‘जमात् उद् दावा’सारख्या इस्लामी जिहादी संघटना अनेक देशविरोधी, जहाल संघटना अन् व्यक्ती यांची ‘फेसबूक’ खाती (अकाऊंट्स) राजरोसपणे चालू आहेत. अन्य सामाजिक माध्यमांवरही ओवैसी यांच्या हिंदुविरोधी जहाल भाषणांचे ‘व्हिडिओ’ उपलब्ध आहेत. त्यातच हिंदुत्वनिष्ठ, हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयी जनजागृती करणार्यांचे फेसबूक खाते बंद करून हिंदूंवर दबावतंत्र निर्माण करण्याचे एक मोठे षड्यंत्र ‘फेसबूक’द्वारे रचले जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगाणामधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या कार्यक्रमांतर्गत ‘फेसबूकचा पक्षपात : हिंदूंचे ‘पेज’ (पृष्ठ) बंद, आतंकवाद्यांचे चालू !’ या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सोशल मिडिया अभ्यासक श्री. अभिनव खरे, ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सहभाग घेतला. या वेळी सर्व मान्यवरांनी ‘देशाच्या घटनेची पायमल्ली करणार्या हिंदुविरोधी फेसबूकवर कारवाई करण्यात यावी’, अशी एकत्रित मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सर्वश्री सुमित सागवेकर आणि आनंद जाखोटिया यांनी केले.
मला भगवंताचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा ! – आमदार टी. राजासिंह
माझ्या आवाजाला हिंदुविरोधी शक्तींना कुठे पसरू द्यायचे नव्हते. ‘फेसबूक व्हिडिओ’च्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य घराघरात पोचत होते. हिंदूसंघटनाचे कार्यक्रम होत होते. कोरोनाच्या संकटकाळात समाजकार्य करण्यासाठी ‘फेसबूक पेज’चा मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. प्रतिदिन १० सहस्र नागरिकांना जेवण देण्याचे कार्य केले जात होते. या सर्व कार्याला फेसबूक ‘पेज’ बंद झाल्याने हानी पोचत आहे. असे असले, तरीही मला भगवंताचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून आम्ही पुढची नीती सिद्ध करत आहोत.
हिंदूंनी फेसबूक वापरणे बंद केल्यास दिवाळखोरी होईल ! – सुरेश चव्हाणके
फेसबूकचा जगामध्ये सर्वाधिक उपयोग भारतात केला जातो. अर्थार्जनासाठी भारतातील बहुसंख्य हिंदूंवरच फेसबूक अवलंबून आहे. असे असूनही हिंदु धर्मासाठी लढणारे कार्यकर्ते, ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनी, सनातन संस्था अशा धर्मप्रसार करणार्यांच्या फेसबूक ‘पेज’वर बंदी आणली आहे. सर्व हिंदूंनी फेसबूक वापरणे बंद केल्यास त्याची दिवाळखोरी होईल. फेसबूकद्वारे ‘पेड सोशल मिडिया’ हे माध्यम राबवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. देशाचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबूकला याविषयी पत्र लिहिले आहे. आपण स्वतःचे पूर्ण ‘डिजिटल’ अस्तित्व हिंदुविरोधकांच्या हातात दिले असल्याने स्वत:ची सामाजिक माध्यमे निर्माण करायला हवीत. देश ‘डिजिटल इंडिया’ होईल; पण ‘डिजिटल हिंदुस्थान’ संपायला नको. फेसबूक जर हिंदूंची ‘फेसबूक पेजेस्’ बंद करणार असेल, तर देशप्रेमी हिंदू ‘फेसबूक’ला भारतातून बहिष्कृत केल्याविना रहाणार नाहीत !
वर्ष २०३० पर्यंत भारतनिर्मित सामाजिक माध्यमे जगात सर्वोच्च होतील ! – अभिनव खरे
बेंगळुरू आणि देहली येथील दंगली फेसबूक लिखाणावरूनच झाल्या. अशा घटनांना फेसबूकद्वारेच खतपाणी घातले जात आहे. इसवी सन ११०० पासून हिंदु संस्कृती संपवण्याची चेष्टा चालू आहे; पण त्यांना लक्षात आले नाही की, कितीही वेगवेगळी माध्यमे वापरली, तरी सनातन हिंदु संस्कृती नष्ट होऊ शकत नाही. यातूनच आपण सांस्कृतिक संघर्षाकडे जात आहोत.
भारतीय अभियंता सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. आपल्याकडे या ज्ञानाचा अतिशय मोठा पाया आहे. यातून वर्ष २०३० पर्यंत भारतनिर्मित सामाजिक माध्यमे जगात सर्वोच्च होतील. चिनी प्रणाली बंद झाल्या, तसेच फेसबूकही बंद केले जाऊ शकते, याची भीती त्यांना वाटायला हवी, तरच ते देशाच्या कायद्याचे उल्लंघन करण्याचे धाडस करणार नाहीत. भारतात सामाजिक माध्यमांना जर काम करायचे असेल, तर आमच्या बहुसंख्यांक लोकांचा विचार करावाच लागेल.
फेसबूकचा ‘सायबर आतंकवाद’ रोखावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ नुसार ‘फेसबूक’ने राष्ट्रहितासाठी कार्य करणार्यांची खाती बंद करून ‘सायबर आतंकवाद’ आरंभला आहे. या आतंकवादाविरोधात कुठल्याही न्यायालयात याचिका प्रविष्ट केली जाऊ शकते. कारणे न देता खाती बंद करण्याची अनुमती फेसबूकला कुणी दिली ? देशात सामाजिक माध्यमांसाठी कोणतेही नियंत्रण मंडळ नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. धर्माभिमान्यांची ‘फेसबूक पेज’ बंद करून लाखो लोकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार आहे. ‘फेसबूक’वरच केंद्र सरकारने बंदी घालावी.
फेसबूक केवळ अर्थार्जन करणारे आस्थापन, न्यायव्यवस्था नव्हे ! – चेतन राजहंस
‘संविधानिक, कायदेशीर आणि सुसंस्कृत भाषेचा उपयोग करून सनातन संस्था जगभरात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी अग्रणी संस्था आहे; मात्र ‘फेसबूक’ने सनातनचे ५ ‘फेसबूक पेज’, तसेच संस्थेच्या अनेक साधकांची वैयक्तिक ‘फेसबूक खाती’ यांवर बंदी आणली. यावरून ‘फेसबूक’चा हिंदु धर्मप्रसाराला आक्षेप आहे, हेच सिद्ध होते. फेसबूक अर्थार्जन करणारे आस्थापन असून ते न्यायव्यवस्था नाही. फेसबूकला ‘आपण अमर आहोत’, असे वाटत असेल, तर केंद्र सरकारने जशी चिनी अॅप्सवर बंदी घातली, तसेच फेसबूक बंद केल्यावर धडा मिळेल.
विशेष
१. चर्चासत्राच्या प्रारंभी फेसबूकद्वारे केल्या जाणार्या पक्षपाताविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.
२. चर्चासत्राचे ‘यूट्यूब’ आणि ‘फेसबूक लाईव्ह’ यांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण २८ सहस्र ६३४ जणांनी पाहिले, तसेच हा विषय ५४ सहस्र ५४६ जणांपर्यंत पोचला (रिच).