फेसबूकचा हा हिंदुद्वेषच होय ! आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्याऐवजी हिंदु धर्माचा शास्त्रीय भाषेत प्रसार करणार्या सनातन संस्थेच्या लिखाणाला ‘आक्षेपार्ह’ ठरवणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होय !
मुंबई : ‘फेसबूक’कडून प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांच्या अस्तित्वात नसलेल्या फेसबूक पेजवर बंदी घातल्यानंतर फेसबूकने सनातन संस्थेच्या ५ अधिकृत ‘फेसबूक पेजेस’ (फेसबूक पाने) आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी घातली आहे. तसेच काही साधकांच्या वैयक्तिक फेसबूक खात्यांवरही बंदी घातली आहे.
‘फेसबूक’ने सनातन संस्थेच्या आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्या फेसबूक अन् इन्स्टाग्राम खात्यांवर घातली बंदी
१. तीन सप्टेंबर २०२० च्या मध्यरात्री अध्यात्मप्रसार करणार्या सनातन संस्थेची ‘सनातन संस्था मराठी’ आणि ‘सनातन संस्था इंग्रजी’, तसेच ‘सनातन संस्था अधिकृत प्रोफाइल पेज’ अशी ३ पेजेसवर बंदी घालण्यात आली.
२. चार सप्टेंबर २०२० या दिवशी तेलंगाणा राज्यातील भाग्यनगर येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. टी. राजासिंह यांच्या ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या पेजेसवर बंदी घालण्यात आली.
३. पाच सप्टेंबर २०२० ला ‘सनातन संस्था कन्नड’ आणि ‘सनातन संस्था बेळगाव’ या ‘पेजेस’ बंद करण्यात आल्या.
४. सनातन संस्थेच्या या ‘फेसबूक पेजेस’द्वारे अध्यात्मप्रसार करणार्या सर्व साधकांची वैयक्तिक ‘फेसबूक’ खातीही बंद करण्यात आली. परिणामी जगभरात होत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या, धर्मप्रसाराच्या कार्याला खीळ बसली.
५. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘सुदर्शन न्यूज’चे ‘फेसबूक पेज’ही अशाच प्रकारे बंद करण्यात आले.
६. ‘OpIndia’ या राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ ‘न्यूज पोर्टल’चे ‘फेसबूक पेज’ बंद करण्यात आले आहे.
७. वर्ष २०१२ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘फेसबूक पेज’वर आणलेली बंदी अद्यापपर्यंत ‘फेसबूक’ने उठवलेली नाही.
ही काही मोजकीच उदाहरणे आहेत. असे आणखी अनेक हिंदु नेते आणि संघटना असतील, ज्यांची ‘फेसबूक पेजेस’ बंद करण्यात आली असतील.
‘सनातन डॉट ओआर्जी’ची लिंक शेअर करण्यावरही ‘फेसबूक’ने घातली बंदी
भविष्यात हिंदूंनी फेसबूकवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवल्यास आश्चर्य वाटणार नाही !
केंद्र सरकारने यात लक्ष घालून ‘फेसबूक’वर कारवाई करणे अपेक्षित !
‘सनातन डॉट ओआर्जी’ची लिंक शेअर करण्यावरही ‘फेसबूक’ने बंदी घातली आहे. त्यामुळे फेसबूकवरून सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा होणारा प्रसारही बंद झाला आहे. या संकेतस्थळावरून लोकांना कोरोनाचे संकट, तसेच एकूणच आपत्काळाविषयी आध्यात्मिक स्तरावर करण्यात येणारे मार्गदर्शनही यामुळे थांबले आहे.
बेंगळुरू येथे खासदार तेजस्वी सूर्य यांना निवेदन
बेंगळुरू (कर्नाटक) : सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक पाने’ बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘स्टँडिंग कमिटी’चे सदस्य, तसेच खासदार तेजस्वी सूर्य यांना ‘ही अचानक घालण्यात आलेली बंदी मागे घेण्यात यावी;’ म्हणून निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, सनातन संस्थेचे श्री. सोमशेखर, भाजपचे श्री. नवीन यांच्यासह इतर धर्मनिष्ठ संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी तेजस्वी सूर्य यांना हे निवेदन देऊन ‘फेसबूकद्वारे काही कारण नसतांना हिंदुत्वनिष्ठ, हिंदु नेते आणि हिंदु संघटना यांचे ‘पेज’ बंद करण्यात येत आहे; परंतु आतंकवाद पसरवणार्या आतंकवाद्यांच्या ‘पेज’वर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले.
संसदीय अधिवेशनातही चर्चा करीन ! – तेजस्वी सूर्य
तेजस्वी सूर्य या वेळी म्हणाले, ‘‘फेसबूक हिंदुत्वाचे कार्य करणार्या संघटनांचे ‘पेज’ बंद करत असल्याचे षड्यंत्र माझ्याही लक्षात आले आहे. त्याविषयी मी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे, तर ‘फेसबूक’च्या भारतातील प्रमुखाकडे याविषयी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याविषयी संसदीय अधिवेशनातही चर्चा करीन.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात