सिंधुदुर्गातील महिला धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’
सिंधुदुर्ग : आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या राजमाता जिजाऊंचे वंशज आहोत. आपण सर्व देवी, वीरांगना यांचे वंशज आहोत. त्यामुळे आपल्याला शौर्याचा इतिहास लाभलेला आहे. हेच शौर्य जागृत होण्यासाठी शक्ती आणि भक्ती यांची उपासना आवश्यक आहे. शक्ती आणि भक्ती याचा जागर केला, तरच आपण येणार्या संकटाला सामोरे जाऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. महिलांमध्ये शौर्य जागृत करणे, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे, आपत्काळाच्या दृष्टीने साधनेचे महत्त्व आणि जीवनातील स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मप्रेमी महिलांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘ऑनलाईन महिला शौर्यजागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात १०० हून अधिक धर्मप्रेमी महिला सहभागी झाल्या होत्या.
धर्मरक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन शौर्य जागृत करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
इतिहासाचे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखे युवा पिढीला शिकवले जाते. यातून आपण काय बोध घेणार ? धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्याला देवतांनी केलेला असुरांचा नाश आणि विरांगनांनी गाजवलेले शौर्य ठाऊक नाही. ते जाणून घेऊन म्हणजे धर्मशिक्षण घेऊन आज महिलांमधील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे. आजच्या घडीला होणारे महिलांवर होणारे बलात्कार, हत्या आदी अत्याचार थांबवायचे असतील, तर प्रत्येक हिंदु स्त्रीने आपल्या मनगटात शक्ती एकटवली पाहिजे. हा खंबीरपणा निर्माण होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वरक्षण प्रशिक्षण शिकून शौर्य जागृत करून स्वयंसिद्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानास हिंदु जनजागृती समितीच्या सौ. ज्योत्स्ना नारकर, सौ. साधना गावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी राऊळ आणि कु. अदिती तवटे यांनी केले.
क्षणचित्र : व्याख्यानात मांडलेला विषय ऐकल्यावर ‘शौर्यजागृती सप्ताह’ चालू करण्याची मागणी महिला धर्मप्रेमींनी केली.
अभिप्राय
सौ. प्रतीक्षा मोहन देशमुख, दोडामार्ग – या कार्यक्रमामुळे मनातील भीती नाहीशी होऊन धाडस निर्माण झाले. संकटकाळात कशा प्रकारे स्वतःचे रक्षण करायचे, ते शिकायला मिळाले. अशा काही कृती आहेत, ज्यांचा उपयोग करून आपण आपले रक्षण करू शकतो, हे कळाले. ईश्वराचे नामस्मरण केल्याने देव आपले सतत रक्षण करतो, त्यासाठी भक्ती वाढवायला हवी, हे लक्षात आले.
कु. प्राजक्ता कोनाडकर – एखाद्यावर अन्याय झाल्यास न्याय मिळण्यास वेळ लागतो. त्यामुळे आपण स्वरक्षण प्रशिक्षण शिकून स्वयंसिद्ध होणे आवश्यक आहे. या व्याख्यानातून शौर्य जागृत होऊन लढण्याची प्रेरणा मिळाली.