जकार्ता (इंडोनेशिया) : इंडोनेशियाने दक्षिण चीन सागरामधील त्याच्या सागरी सीमेत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले. या घटनेनंतर आता दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. चीनकडून पलटवार होण्याची शक्यता गृहित धरून इंडोनेशियाने युद्धनौकांची गस्त वाढवली आहे. याआधी जपानने त्याच्या सागरी सीमेत घुसलेल्या चीनच्या पाणबुडीला पिटाळून लावले होते.
इंडोनेशियाने चीनच्या गस्ती पथकाच्या नौकेला नातुना बेटाजवळून हुसकावून लावले आहे. हा भाग इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक भागात येतो. इंडोनेशियाच्या समुद्र सुरक्षा यंत्रणांना चीनची नौका त्याच्या सीमेत शिरली असल्याची माहिती मिळाल्यावर त्याने त्याची नौका चीनच्या या गस्ती नौकेजवळ पाठवली. या दोन्ही नौकांमध्ये एक किलोमीटरच्या अंतरावरून चर्चा झाली. त्यात इंडोनेशियाने चीनच्या नौकेला त्या परिसरातून निघून जाण्यास सांगितले; मात्र चीनच्या नौकेने हा भाग त्याच्या सीमेमध्ये येत असल्याचे म्हटल्यावर आक्रमक पवित्रा घेऊन इंडोनेशियाच्या नौकेने चीनच्या नौकेला पिटाळून लावले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात