हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुग्राम (हरियाणा) येथे राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन
फरीदाबाद (हरियाणा) : विविध उत्पादनांच्या वेष्टनांवर हिंदु देवतांची चित्रे छापलेली असतात. त्या वेष्टनांचे काम झाल्यावर आपण ती कचर्यात फेकून देतो. या व्यतिरिक्त चित्रपट, नाटके, सामाजिक माध्यमे, स्टँड अप कॉमेडी, वेब सिरीज आदींच्या माध्यमातून हिंदु देवतांचे षड्यंत्रपूर्वक विडंबन केले जाते आणि युवा पिढीच्या मनात देवतांविषयी घृणा निर्माण केली जाते. असे विडंबन थांबवण्याठी वैयक्तिक किंवा सामूहिक स्तरावर वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप मुंजाल यांनी केले. राष्ट्र सेविका समितीची ‘ई’ शाखा, गुरुग्राम विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अनेक महिला जोडलेल्या होत्या.
यापुढे देवतांच्या विडंबनाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करू ! – सौ. प्रतिमा मनचंदा
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. प्रतिमा मनचंदा म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारे आमच्याकडूनही देवतांचा अनादर झाला आहे. यापुढे आम्ही देवतांचे चित्र असलेली कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही. तसेच संबंधित उत्पादकाला दूरभाष किंवा पत्र लिहून असे न करण्याविषयी प्रबोधन करू. याखेरीज आम्ही ट्विटरवरून राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विचार व्यक्त करून आमची समष्टी साधना करू. हिंदु जनजागृती समिती समाजाला जागृत करण्याचा अतिशय स्तुत्य प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढेही आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.’’