सोलापूर येथे ऑनलाईन ‘शौर्यजागृती व्याख्याना’मध्ये महिला आणि युवती यांचा स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा निर्धार
सोलापूर : सध्या महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. देहलीतील ९० वर्षांच्या महिलेवर अत्याचार झाले. १९ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलीवर रुग्णवाहिका चालकाने बलात्कार केला, अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांनंतर मोर्चे निघाले, तसेच काही कायदेही करण्यात आले; मात्र हे प्रकार थांबत नाहीत. पाश्चिमात्य पद्धतीने ‘डे’ (दिवस) साजरे केल्याने युवतींच्या जीवनामध्ये नैतिक अध:पतन होऊन जीवन अंध:कारमय होत आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली चालू असलेला स्वैराचार थांबायला हवा. कुणीतरी येईल आणि आम्हाला वाचवेल, या भ्रमात राहू नका. धर्माचे आचरण करून आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मसंपन्न व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. येथील महिला आणि युवती यांच्यासाठी १३ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’त त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील ६४० हून अधिक महिला आणि युवती सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवलीला गुब्याड यांनी केले.
महिलांनी देवीची उपासना करून आत्मबळ वाढवावे ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
महिलांना स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जो वाईट दृष्टीने बघतो, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आत्मबळ वाढवा. प्रत्येक ‘स्त्री’मध्ये देवीतत्त्व असून ते जागृत करण्याची आवश्यकता आहे. हिंदु धर्मातील विविध देवींनी दैत्यांचा संहार केला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीदेवीचे उपासक होते. त्यामुळे ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आत्मबळ असल्यास शत्रू कितीही मोठा असला, तरी त्याचा प्रतिकार करता येतो. त्यामुळे आपल्या कुलदेवीची उपासना करून आपल्यातील आत्मबळ वाढवा.
विशेष
१. या वेळी ‘व्हिडिओ’च्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
२. कार्यक्रमामध्ये श्री. सुमित सागवेकर यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची सिद्धता असणार्या युवतींना ‘जय भवानी’ या संदेशाद्वारे संमती दर्शवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक युवतींनी तसा संदेश पाठवत उत्स्फूर्तपणे अनुमोदन दिले.
३. उपस्थित महिला आणि युवती यांनी ‘व्याख्यान पुष्कळ चांगले झाले अन् ते ऐकल्याने एक वेगळीच स्फूर्ती निर्माण झाली’, असे सांगितले.
अभिप्राय
निशा पांचाल : या कार्यक्रमाचे आयोजन केल्याविषयी धन्यवाद ! हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी व्याख्यान महत्त्वाचे होते.
सौ. अनुजा देशमुख : व्याख्यानाच्या वेळी भक्ती आणि शक्ती यांचा जागर झाल्यासारखे वाटले.
प्रज्ञा देशमुख : या व्याख्यानामुळे प्रत्येक महिलेला स्वत:मधील शक्तीची जाणीव झाली, असे मला वाटले.
डॉ. ईशा वैद्य : व्याख्यानातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. स्वरक्षण प्रशिक्षण विषयक प्रात्यक्षिके पाहिल्याने ते शिकून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. हे स्वरक्षण प्रशिक्षण मला शिकायचे आहे.
कु. सोनाली गोहोने : व्याख्यानात पुष्कळ सुंदर मार्गदर्शन मिळाले. नवीन पिढीला याविषयी माहिती नव्हते. ‘कराटे’ प्रशिक्षण घेतले, तरी आवश्यक ते आत्मबळ नसल्याने प्रतिकार करता येत नाही. त्यामुळे या व्याख्यानातून ते आत्मबळ कसे निर्माण करायचे, ते शिकता आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात