Menu Close

मडगाव स्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोषत्वावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडून शिक्कामोर्तब

मडगाव (गोवा) – मडगाव येथे वर्ष २००९ मध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी ६ आरोपींच्या निर्दोषत्वावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शिक्कामोर्तब केले.

या प्रकरणी सर्वश्री विनय तळेकर, दिलीप माणगावकर, विनायक पाटील, प्रशांत जुवेकर, धनंजय अष्टेकर आणि प्रशांत अष्टेकर या ६ जणांना गोव्यातील विशेष न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१३ या दिवशी निर्दोष ठरवले होते. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान याचिका (अपील) प्रविष्ट केली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद १६ सप्टेंबरला पूर्ण होऊन निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर या दिवशी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत ‘एन्.आय.ए.’ची आव्हान याचिका (अपील) फेटाळून लावली. या वेळी एन्.आय.ए.च्या बाजूने अतिरिक्त शासकीय अधिवक्ता प्रवीण फळदेसाई यांनी, तर आरोपींच्या बाजूने अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता नागेश जोशी यांनी बाजू मांडली.

निकालपत्रातील ठळक सूत्रे

१. सनातन संस्थेने वर्ष २००१ आणि वर्ष २००९ या वर्षांत नरकासुर स्पर्धेला विरोध केला होता. तथापि या सूत्रांवरून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नाही.

२. आरोपींनी स्फोटाचे षड्यंत्र रचल्याचा कोणताही स्वतंत्र पुरावा एन्.आय.ए. न्यायालयासमोर आणू शकली नाही.

३. आरोपींकडून स्फोटके जप्त झालेली नाहीत आणि केवळ त्यांनी स्फोटके नदीत टाकल्याचा एन्.आय.ए.चा आरोप ‘भारतीय साक्षीपुरावा कायद्या’न्वये अग्राह्य आहे.

४. एन्.आय.ए.ने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे अतिशय कमकुवत आणि अर्धवट आहेत.

५. एन्.आय.ए.ची काही सूत्रे ग्राह्य धरली, तरी विशेष न्यायालयाने दिलेल्या आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या आदेशामध्ये काही पालट करण्याची आवश्यकता उच्च न्यायालयाला वाटत नाही.

हिंदुविरोधकांचे सनातनला दोषी ठरवण्याचे षड्यंत्र पुन्हा विफल ! – सनातन संस्था

फोंडा (गोवा) – मडगाव स्फोट प्रकरणी सातत्याने काही हिंदुविरोधी शक्ती, तसेच पुरोगामी सनातन संस्थेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेल्या निर्णयाने सनातनला दोषी ठरवण्याचे षड्यंत्र विफल ठरले. या प्रकरणी ६ निष्पाप साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. ४ वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होते. याविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतो. भगव्या आतंकवादाच्या मिथकाचा प्रचार करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *