Menu Close

वयाच्या १०३ व्या वर्षी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची कोरोनावर मात

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून सदैव अस्तित्व अनुभवल्याचे पू. पाटीलआजी यांची माहिती

मुंबई : वयाच्या १०३ व्या वर्षी कोरोनावर मात करणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांच्याकडून रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी, तसेच समाज यांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘फेसबूक’ खात्यावर याविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तामध्ये अनेकांनी पू. आनंदी पाटीलआजी यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून उल्लेख करून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आणि त्यांचे अभिनंदनही केले. पू. आनंदी पाटील या सनातनच्या ५७ व्या संत आहेत. त्या डोंबिवली येथे त्यांच्या नातवंडांच्या घरी रहातात. त्यांचा कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आल्यावर १४ सप्टेंबर या दिवशी त्यांना डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलातील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. २० सप्टेंबर या दिवशी करण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचणीमध्ये त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ म्हणजेच त्या कोरोनामुक्त झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘फेसबूक’ खात्यावरून माहिती प्रसिद्ध झाल्यावर समाजातून पू. पाटीलआजी यांचे अभिनंदन !

पू. पाटीलआजी यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘फेसबूक’ खात्याद्वारे देण्यात आली. यामध्ये पू. पाटीलआजी यांचे स्मित हास्य करतांनाचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले. ही माहिती वाचून अनेकांनी पू. आजींचे अभिनंदन केले, तसेच भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. एका नेटकर्‍याने ‘आजींचे हास्य सुंदर आहे. ‘तरुण’ आजींचे आणि तुमची काळजी घेणार्‍या आधुनिक वैद्यांचे अभिनंदन’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेकांनी आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांचेही अभिनंदन केले आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आरोग्यसेवा देणार्‍यांचे अभिनंदन !

एवढ्या वयात आजींनी कोरोनावर मात केल्याविषयी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून रुग्णालयातील आधुनिक वैद्य, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रशासकीय अधिकारी यांसह संपूर्ण आरोग्य कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

‘रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर पहिले २-३ दिवस आजींची प्रकृती बरी नव्हती. त्यानंतर मात्र त्या सतत आनंदी असायच्या. रुग्णालयात परिचारिका आणि कर्मचारी यांच्याशी त्या उत्साहाने अन् प्रेमाने बोलायच्या. त्यामुळे बहुतांश परिचारिका  स्वत:च्या भ्रमणभाषवर आजींसमवेत छायाचित्र काढायच्या’, असे आजींची नात सौ. दीपा म्हात्रे यांनी सांगितले.

पू. आनंदी पाटील यांनी रुग्णालयात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व सदैव अनुभवणे

कोरोनावर मात करून घरी आल्यावर याविषयीचा अनुभव सांगतांना पू. आनंदी पाटील यांनी सांगितले, ‘‘मी रुग्णालयात गेले, त्या वेळी  तेथे सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव माझ्यासमवेत होते. तेथे त्यांचे सूक्ष्मातील अस्तित्व मी सदैव अनुभवत होते.’’

सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *