‘अभियंता दिना’च्या निमित्ताने ‘तंत्रज्ञानात प्रगत प्राचीन भारत’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
पुणे : हिंदु संस्कृती प्रकृतीला देव मानते. आधुनिक विज्ञानाचा कितीही उदो उदो केला, तरी त्याला मर्यादा आहेत. भारतीय तत्त्वज्ञानानुसार विज्ञान हे धर्माचेच अंग आहे. प्राचीन भारतीय ऋषींनी आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेद्वारे मूलभूत ज्ञान सांगितले आहेे. त्यामुळे भारतामध्ये शिल्पशास्त्र, अग्नियानशास्त्र, नौकायनशास्त्र, चिकित्साशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आदी अनेक शास्त्रे अत्यंत प्रगत होती; मात्र मोगल, इंग्रज आणि परकीय आक्रमक यांनी प्राचीन अमूल्य ग्रंथसंपदा नष्ट केली, अनेक गोष्टी चोरून नेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात ‘मेकॉले’प्रणित शिक्षणव्यवस्था अंगीकारून प्राचीन ज्ञानाची उपेक्षा केली गेली. पुढे खरा इतिहास आणि ज्ञान भारतियांपर्यंत पोचू दिले नाही. या प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘अभियंता दिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘तंत्रज्ञानात प्रगत प्राचीन भारत’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमात प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे अभ्यासक तथा लेखक श्री. विजयकुमार उपाध्याय, जर्मनी येथून गणिततज्ञ अन् ‘हिंदु मॅथेमॅटिक्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. भास्कर कांबळे यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की,
भारत ३ बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे भारताचे प्रमुख व्यापारादी कार्ये समुद्रमार्गावरच अवलंबून होती. इंग्रजीमधील ‘नेव्हिगेशन’ आणि ‘नेव्ही’ हे शब्दही ‘नावगती’ आणि ‘नाव’ या संस्कृत शब्दांवरून घेतले आहेत. भारतीय जलसेनेच्या घोषवाक्यातही ‘शं नो वरुण:’ अर्थात् ‘वरुणदेवतेचा कृपाशीर्वाद आमच्यावर असू दे’ असे म्हटले आहे. ज्या देवतेला सागरातील सर्व मार्ग ठाऊक आहेत, अशी वरुण देवता आहे, हा संदर्भ हिंदु धर्मग्रंथांमध्ये आढळतो. नक्षत्रांवर अवलंबून सागरी मार्ग निर्माण करून व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये भारतातील तत्कालीन राजे-महाराजे सागरी प्रवास करत असल्याने या देशांमध्ये हिंदु संस्कृतीशी संबंधित प्राचीन अवशेष सापडतात. वास्को द गामाचा खोटा इतिहास आपल्याला शिकवला जात आहे. स्वत: वास्को द गामाने त्याच्या पुस्तकात ‘चंदन नावाच्या गुजराती व्यापार्यासमवेत तो भारतापर्यंत आला’, असे नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्ध केेलेले जलदुर्ग, जलसेना आणि त्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही आपले समुद्री सामर्थ्य वेळोवेळी दाखवून दिले आहे.
प्राचीन भारताला वैज्ञानिक परंपरा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
युरोपची तर्कबुद्धी, त्यांची प्रयोगशीलता अत्यंत संवेदनशून्य होती. पश्चिमी ख्रिस्ती धर्मगुरु यांनी बायबल व्यतिरिक्त ज्ञानाला नाकारल्यामुळे त्यांची संशोधनहीनता स्पष्ट होते. त्याउलट प्राचीन भारताला वैज्ञानिक परंपरा लाभली आहे. अश्विनीकुमार यांनी दृष्टीहीन झालेल्या उपमन्यूला दृष्टी मिळवून दिली होती, असा संदर्भ महाभारतात मिळतो. रामायणात इच्छेनुसार उडणार्या पुष्पक विमानांचा उल्लेख मिळतो. चरक, सुश्रुत, नागार्जुन यांचे धातूंपासून बनवण्यात आलेले चूर्ण आदी संदर्भ उपलब्ध आहेत. भारतातील विजय स्तंभाचे गंज न लागण्याचे मूळ कारण अजूनही शास्त्रज्ञ शोधत आहेत. अशा प्रतिभासंपन्न राष्ट्राचा इतिहास आक्रमकांनी नष्ट केला.
प्राचीन भारतीय ज्ञान शिकवल्यास भारत विश्वगुरु होईल ! – विजयकुमार उपाध्याय
चार वेद हे ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत. वेदांमध्ये बीजरूपाने असलेल्या ज्ञानाचा वेदांग, दर्शनशास्त्र, उपवेद आदींमध्ये विस्तार केला आहे; पण दुर्दैवाने आज प्राचीन ज्ञानग्रंथ अखंडित रूपात उपलब्ध नाहीत. आपल्याकडे जे प्राचीन ज्ञान उपलब्ध आहे, ते क्रमिक अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. तसे झाले, तर भारत विश्वगुरु म्हणून पुनर्स्थापित होऊ शकेल. यथार्थ शास्त्राचे अज्ञान, कलुषित हेतू आणि विदेशी विचार यांमुळे आज भारतीय शास्त्राविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. विमानशास्त्र हे कपोलकल्पित असल्याचा अपप्रचार केला जातो; पण आजच्या काळात झालेल्या संशोधनाद्वारेही प्राचीन भारतीय ज्ञानाची पुष्टी मिळत आहे. युरोपमध्ये जी वैज्ञानिक प्रगती झालेली पहायला मिळाली, त्यामागचे ज्ञान भारतातूनच अरब, पर्शिया मार्गे युरोपमध्ये गेले आहे. भारतात शिल्पशास्त्र प्रचलित असून ‘शिल्प’ या शब्दाची व्यापक व्याख्या ‘भृगुशिल्पसंहिता’ यात आपल्याला आढळते. या संहितेत ३ खंड, १० शिल्पशास्त्र, ३२ शिल्पकला, ६४ शिल्पविद्या इतके मोठे ज्ञान भांडार उपलब्ध आहे. महर्षि भरद्वाज यांचे ‘अंशुबोधिनी’ आणि अन्य ग्रंथांमधील संदर्भ वापरून पंडित शिवकर बापूजी तळपदे यांनी वैदिक विमान सिद्ध केले होेते. हे ज्ञान प्रस्तुत करून पुढे न्यायला हवे.
या कार्यक्रमामध्ये डॉ. भास्कर कांबळे यांनी ‘हिंदु गणितातील ट्रिग्नोमेट्री’ या विषयावर माहिती देत ‘गणिताची उत्पत्ती ग्रीसमध्ये नाही, तर भारतातच झाली’, असे सांगितले. विदेशी गणित तज्ञांच्या सहस्रो वर्षे आधी श्लोक वा सूत्र रूपाने माहिती देणारे भास्कराचार्य, आर्यभट्ट, माधव, ब्रह्मगुप्त यांची माहितीही डॉ. कांबळे यांनी दिली.
‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा परिसंवाद ६० सहस्र लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर २ लाख २८ सहस्र लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचला (रिच).