अमेरिका देश गेल्या काही मासांपासून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. तेथील अनेक शहरे आणि जंगले येथे मोठ्या प्रमाणात वणवा पेटला आहे. वणव्यामुळे बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे. सहस्रावधी घरे जळून खाक झाली आहेत. १० सहस्रांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत, तर लक्षावधी लोकांना सुरक्षितस्थळी हालवले आहे. अमेरिकेतील ओरेगन राज्यात ३ सहस्र ७५० वर्ग कि.मी. क्षेत्रात वणवा पेटल्याने तिकडच्या जंगलातील सहस्रो प्राणीही होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. प्रचंड हानी झाल्याने राज्यातील अग्नीशमन दलाचे प्रमुख फायर मार्शल जिम वॉकर यांच्यावर त्यागपत्र देण्याची वेळ ओढवली आहे. अमेरिकेतील फीनिक्स, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन यांसह १२ राज्ये वणव्याच्या विळख्यात पुरती अडकली आहेत. कॅलिफोर्निया येथील ४० लाख एकर भूभाग वणव्यात जळून नष्ट झाला आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठीही अग्नीशमन दलाचे १४ सहस्रांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत, तर ६० हून अधिक हेलिकॉप्टर्स वापरण्यात येत आहेत. ‘कॅलिफोर्नियातील वणवा ही भीषण दुर्घटना आहे’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, तर ‘हा वणवा म्हणजे राज्याच्या इतिहासातील तिसर्या क्रमांकाची विनाशकारी दुर्घटना आहे’, असे राज्यपाल गॅव्हिन न्यूसोम यांनी सांगितले. आतापर्यंत वणव्यामुळे तेथील ३० टक्के जंगल नष्ट झाले आहे, तसेच वातावरणातील उष्णताही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वणव्यामुळे सर्वत्र धुराचे लोळ उठत असल्याने श्वसनाच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. आधीच अमेरिकेतील लक्षावधी नागरिकांना कोरोना विषाणूने ग्रासले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे थैमान, तर दुसरीकडे धुमसणारा वणवा अशा दुहेरी संकटात अमेरिका पुरती अडकून पडली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अग्नीशमन दलाकडील कुमक न्यून झाल्यानेे शेवटी कारागृहातील आरोपींच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच कारागृहातील आरोपींचे साहाय्य घेण्याची वेळ अमेरिकेवर ओढवली आहे. वणव्यापासून वाचण्यासाठी लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे; मात्र कोरोनामुळे तसे स्थलांतर करतांना अनेकांची भीतीने गाळण उडाली आहे.
वनसंपदा जोपासणे हे राष्ट्रकर्तव्य !
जंगलात वणवा पेटलेला आहेच; पण तेथे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचाही वणवा धगधगत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वणव्याला भूमी व्यवस्थापनाची अयोग्य पद्धत कारणीभूत असल्याचे सांगितले. त्यावर कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हिन न्यूसोम यांनी पर्यावरणात पालट झाल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे सांगत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले. खरेतर वणवा किंवा आग या समस्या जागतिक पर्यावरणावर भयंकर वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळाने वणव्याचे खापर एकमेकांवर फोडण्यापेक्षा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय चेंडू तुडवण्यापेक्षा समस्येवर तोडगा काढायला हवा. वन विभागानेही आग लागू नये, तसेच त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचा अवलंब करायला हवा. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हिन न्यूसोम यांनी एक दिवस ‘क्लायमेट अॅक्शन डे’ (पर्यावरण कृती दिवस) घोषित करून त्यानिमित्ताने तज्ञ आणि नागरिक यांची चर्चा घडवून आणली. सर्वांचाच त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला. पर्यावरणीय पालट, प्रदूषण आदी रोखण्यासाठी अनेकांनी विविध उपाययोजनाही सुचवल्या. काही वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशातील अॅमेझॉनच्या भव्य जंगलात भीषण आग लागली होती. त्यामुळे पुष्कळ विध्वंस झाला होता. अॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वांत मोठे जंगल असून जगात अनुमाने २० टक्के ऑक्सिजन हे जंगल पुरवते. त्यामुळे या जंगलाला ‘संपूर्ण जगाचे फुप्फुस’ म्हणावे लागेल. त्या आगीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले गेले. तेव्हा जागतिक तापमानवाढ, लोकांचे पालटते रहाणीमान या गोष्टींवर चर्चा झाली. केवळ चर्चा करून न थांबता जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशांनी ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. सर्वत्रची जंगले ही प्रतिवर्षी लाखो टन कार्बनचे उत्सर्जन शोषून घेतात. त्यामुळे विश्वाला लाभलेली वनसंपदा जोपासणे हे प्रत्येकाचे राष्ट्रकर्तव्य आहे.
पर्यावरणाचा समतोल साधा !
वणव्याच्या घटना जरी अमेरिकेत घडत असल्या, तरी भारताची स्थिती याहून काही वेगळी नाही. जंगलातील वणव्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सर्वांच्या पुढे असल्याचे केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात ४ सहस्र २७ ठिकाणी आग लागली. त्यामुळे १६ सहस्र ८१५ हेक्टर जंगल जळून खाक झाले. महाराष्ट्रा नंतर दुसर्या क्रमांकावर मध्यप्रदेश, तर तिसर्या क्रमांकावर छत्तीसगड आहे. भारताची सध्याची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे भारतात प्रदूषण वाढत आहे. विकासाच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा र्हास, प्रचंड प्रमाणात केली जाणारी वृक्षतोड, आधुनिक चकचकाटासाठी समुद्रात भराव टाकून त्याला बुजवून त्यावर रस्ते बांधणे, या सर्वांमुळे वाढते प्रदूषण अनेकांच्या जिवावर बेतत आहे. जल, जंगल आणि भूमी ही पर्यावरणाची त्रिसूत्रीच आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होत असल्याने ओझोनच्या थराची हानी होत आहे. संपूर्ण मानवजातीने पर्यावरणाविषयी जागरूक होऊन झाडे लावणे, वृक्षसंगोपन करणे, प्रदूषण टाळणे, हरित क्षेत्रावर भर देणे, असे प्रयत्न करायला हवेत. आधुनिक विकासाच्या मागे न धावता पर्यावरणाचा समतोल साधला गेला, तरच खरा विकास होऊन राष्ट्रहित साधले जाईल. तीच प्रदूषणमुक्तीकडे होणारी वाटचाल असेल. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे अमेरिकेच्या उदाहरणातून शिकून आता भारताने तरी शहाणे व्हावे, ही अपेक्षा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात