शक्ती आणि भक्ती यांचा जागर केल्यास कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्याला देवतांनी केलेला असुरांचा नाश आणि विरांगनांनी गाजवलेले शौर्य ठाऊक नाही. ते जाणून घेऊन म्हणजे धर्मशिक्षण घेऊन महिलांमधील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे. आपल्याला शौर्याचा इतिहास लाभलेला आहे. हेच शौर्य जागृत होण्यासाठी शक्ती आणि भक्ती यांची उपासना आवश्यक आहे. शक्ती आणि भक्ती याचा जागर केला, तर आपण कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महिला शौर्यजागृती’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या या व्याख्यानाचा लाभ ३०० हून अधिक महिलांनी घेतला.
या व्याख्यानाचा उद्देश सौ. मेघमाला जोशी यांनी स्पष्ट केला, तर कु. चारुशीला शिंदे यांनी ‘महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग का महत्त्वाचा आहे ?’, याविषयी माहिती दिली. या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर म्हणाल्या, ‘‘राजमाता जिजाऊंनी भक्ती आणि शक्ती यांची उपासना करून पराक्रम गाजवला. तो आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. राजमाता जिजाऊंनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, त्याप्रमाणेच आपणही शौर्यासमवेत भक्तीची उपासना करून राष्ट्राला जगद्गुरु बनवण्यासाठी सक्षम व्हावे.’’ या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके एका व्हिडिओद्वारे ऑनलाईन दाखवण्यात आली.
सहभागी महिला-युवती यांचे अभिप्राय
कु. ऋतुजा सुतार : व्याख्यान आवडले. याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल.
कु. अर्चना ओतारी : येणार्या आपत्काळासाठी काय करायला हवे, याची माहिती मिळाली.
कु. नेहा कसलकर : स्वतःचे रक्षण कसे करावे, हे शिकायला मिळाले.
राजश्री तळप : प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पुत्र असावा आणि राजमाता जिजाऊ यांच्यासारखी मुलगी असावी, असे सकारात्मक विचार जागृत झाले. व्याख्यानातून श्री बगलामुखीदेवीविषयी पुष्कळ चांगली माहिती मिळाली.
सौ. सुप्रिया गायकवाड : देवीचे माहात्म्य आणि कुलदेवीचा नामजप यांविषयी माहिती मिळाली. महिलांनी न घाबरता जगण्यासाठी साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे महत्त्वाचे आहे, हे कळाले.
सौ. साक्षी मिणचेकर : येणार्या काळात स्वत:चे आणि कुटुंबीय यांचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याची जाणीव झाली.