पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ महिला शौर्यवर्गाची सांगता नुकतीच झाली. येथे झालेल्या शौर्यजागृती व्याख्यानानंतर महिलांसाठी १४ दिवसांचे सकाळी आणि सायंकाळी नियमित शौर्यजागृती वर्ग घेण्यात आले. या वर्गाला पुणे अन् सातारा जिल्ह्यांतील अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शेवटच्या दिवशी पार पडलेल्या सांगता बैठकीमध्ये समितीच्या कु. क्रांती पेटकर, तसेच कु. शिवलीला गुब्याड यांनी ‘समाजाची सद्य:स्थिती आणि येणारा आपत्काळ’, ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ आणि ‘साधनेचे महत्त्व’ या विषयांवर उपस्थितांना संबोधित केले.
बैठकीनंतर उपस्थित महिलांनी अनुभवकथन केले. ‘या वर्गाच्या माध्यमातून अनेक विषय शिकायला मिळाले. तसेच स्वतःच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक पालट झाले’, असे काही महिलांनी सांगितले. यापुढेही प्रशिक्षण शिकण्याची इच्छा उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली. या मागणीमुळे आठवड्यातून ४ दिवस नियमित स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
सौ. तृप्ती पाटील – आरंभी शारीरिक त्रास होत असल्यामुळे वर्गाला जोडण्याविषयी नकारात्मकता होती; पण वर्गात देवीचा जप करण्यास सांगितल्यापासून उत्साह वाढला. ‘आपण शिकायचेच आहे’, असा मनाचा निर्धार केला. त्यामुळे मी वर्गांना नियमित जोडू शकले. तसेच शौर्यजागृती वर्गाच्या माध्यमातून नियोजन कौशल्य शिकता आले. त्यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक पालट जाणवत आहे.
सौ. शैला दारवातकर – प्रार्थना करून आणि वेगवेगळे भाव ठेवून प्रशिक्षण शिकल्यामुळे ते त्वरित आत्मसात करता आले.
सौ. स्मिता गोरे – मला शिकण्याची इच्छा होती; पण वय जास्त असल्यामुळे ‘वर्गाला जोडता येणार नाही’, असे वाटले; पण प्रयत्न करायचे ठरवले. नामाची जोड दिल्यावर देवीची शक्ती अनुभवता आली आणि त्यामुळे सर्व सहज शिकू शकले. एखादा प्रसंग समोर आल्यावर मी त्याचा कसा प्रतिकार करीन ? याचा मानसिक स्तरावर सराव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आत्मविश्वास वाढायला साहाय्य झाले.