धर्मरक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन
यवतमाळ : धर्मरक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन व्हावे, धर्महानी रोखावी, धर्मकार्य करतांनी योग्य दिशा मिळावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी दुसर्या विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला.
बैठकीचा प्रारंभ श्लोकाने करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी दळणवळण बंदीच्या काळात धर्महानी रोखण्यासाठी केलेले प्रत्यक्ष कृतीचे अनुभव सांगितले. यामध्ये श्री. राहुल एकडे आणि श्री. जितू मोरे (नांदुरा, बुलढाणा), श्री. विपीन राऊत, (चंद्रपूर), अधिवक्त्या (सौ.) श्रुती भट (अकोला) यांनी कृतीशील प्रयत्न केले. धर्महानी रोखण्यासाठी सामाजिक माध्यमाद्वारे ‘ऑनलाईन’ निषेध नोंदवणे, हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शासनाला निवेदन देणे, चित्रपट आणि मालिका यांच्या माध्यमातून देवता अन् संत यांची विटंबना करणारे दिग्दर्शक, तसेच केंद्रीय परिनिरीक्षण मंडळ यांना निवेदन देणे, ‘ऑनलाईन’ पद्धतीने आंदोलन करणे, हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पाक्षिक बैठक घेणे इत्यादी प्रत्यक्ष कृतीच्या सूत्रांना सर्व संघटनांनी सहमती दर्शवली. बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘धर्मकार्याला साधनेची जोड दिल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याने साधनेचे महत्त्व स्वतःच्या मनावर बिंबवावे लागणार आहे.’’ या वेळी त्यांनी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त या नामजपाचे महत्त्वही सांगितले.