अवामी विकास पार्टीचे अश्रफ वांकर यांना धमकी दिल्याचे प्रकरण
सांगली – अवामी विकास पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्रफ वांकर (रहाणार बुधगाव) यांना भ्रमणभाषवरून धमकी दिल्याच्या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अश्रफ वांकर यांनी १६ एपिल या दिवशी देसाई यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्र्रार दिली आहे. (तृप्ती देसाई यांनी आजपर्यंत अनेक वेळा जमावबंदी मोडणे, तसेच अन्य कायदे तोडलेले आहेत, असे असतांना त्यांच्यावर आजपर्यंत एकादाही अटकेची कारवाई का झाली नाही ? भारतातील कायदे जर सर्वांसाठी समान आहेत, तर तृप्ती देसाई यांना त्यातून सवलत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
तृप्ती देसाई यांनी नुकतेच हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचे घोषित केले होते. त्यावर वांकर यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर एक पोस्ट टाकली होती. त्यात तुम्ही धार्मिकवाद वाढवण्याचे काम करत आहात. राज्यात महिलांचे इतर अनेक प्रश्न असतांना तुम्ही मंदिर आणि दर्गा प्रवेशाच्या मागे का लागला आहात ? मुस्लीम लॉ वेगळा आहे. महिलांविषयी तुम्हाला काम करण्यासाठी मद्यबंदी, स्त्री भ्रूणहत्या थांबवणे यांसारख्या विषयांवर आंदोलन करता येऊ शकते. तुम्ही दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला कोठेही फिरू देणार नाही. कोल्हापुरात मंदिरात प्रवेश करतांना तुम्हाला मारहाण झाल्याचे समजते. त्यामुळे तुम्ही तुमची तब्येत सांभाळून रहावे, असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
यावर शनिवारी देसाई यांनी वांकर यांच्या भ्रमणभाषवर संपर्क केला. देसाई यांनी अश्रफ तुला मस्ती आली आहे. माझ्याविषयी फेसबूकवर काहीही पोस्ट टाकतोस काय ? तुझ्यात दम असेल, तर माझा पत्ता देते, समोर येऊन बोल. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतांना माझे काही बरेवाईट झाल्यास मी सर्व प्रथम पोलिसांना तुझे नाव देईन, अशा प्रकारे धमकी देणारे संभाषण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. देसाई आणि वांकर यांच्यात झालेल्या संभाषणाचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) सामाजिक संकेस्थळावर सर्वत्र फिरत आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात