इतिहासातील पराक्रम आणि शौर्य स्वत:मध्ये जागृत करणे, ही काळाची आवश्यकता : निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
रत्नागिरी : आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय संस्कृतीचे आचरण करणे, यज्ञयाग आणि नामजपाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. त्यामुळे सर्वजण हात जोडून नमस्कार करायला लागले. त्याचसमवेत स्वत:मध्ये शौर्यजागृत करणेही महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अनेक मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी शौर्य गाजवले. भारताला शौर्याचा मोठा इतिहास आहे; मात्र इतिहास गोष्टी स्वरूपात न शिकता त्यातील पराक्रम, शौर्य स्वतःमध्ये जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. जिल्ह्यातील देवरुख आणि रत्नागिरी तालुका यांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नयना दळवी यांनी केले.
या व्याख्यानानंतर मनोगत व्यक्त करतांना धर्मप्रेमींनी ‘आम्ही आणि आमची मुले स्वरक्षण प्रशिक्षण शिकायला सिद्ध आहोत’, असे सांगितले, तसेच ‘लवकरात लवकर प्रशिक्षणवर्ग चालू करावा’, अशी मागणी केली. या वेळी समितीचे श्री. वसंत दळवी यांनी सर्व धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात