चौथऱ्यावर चढण्याचे आंदोलन करणार्यान प्रसिद्धीलोलुप महिलांना सणसणीत चपराक !
पुणे : स्त्री ही शक्तीस्वरूप आहे. स्त्रियांनी शक्तीप्रमाणे राहिले पाहिजे. आज शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी, तसेच मंदिराच्या गाभार्यात जाण्यासाठी महिलांकडून आंदोलने केली जात आहेत. परंपरांना कात्री लावण्याचा हा भाग आहे. परंपरांचे पालन केले जावे. त्यातूनच समाधानाची प्राप्ती होते. हृदयातच देव नसणार्यांना चौथऱ्यावर चढून देव कसा भेटेल, असा परखड प्रश्न उपस्थित करत वेदशास्त्रसंपन्न अतुल शास्त्री भगरेगुरुजी यांनी चौथऱ्यावर चढण्यासाठी, तसेच गाभार्यात शिरण्यासाठी आंदोलन करणार्या महिलांवर टीका केली. आज रूढी, परंपरा, देवस्थाने, धर्म, राष्ट्र यांवर होणारी आक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे विखुरलेले न रहाता संघटित रहाणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी हिंदूसंघटनाचे आवाहन केले. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीरामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पं. भगरेगुरुजी यांचे श्रीरामचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक, किशोर चव्हाण, शरद जगताप, तनिष्का गटाच्या सौ. ज्योती गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते
पं. भगरेगुरुजी यांनी प्रतिपादिलेली अन्य वक्तव्ये
१. रामचरित्राचे केवळ पारायण न करता, ते समजून घेऊन आचरणात आणायला हवे.
२. देव, धर्म, देश यांच्याविषयी काहीच वाटत नाही, अशी आजच्या समाजाची स्थिती आहे. त्यावर रामचरित्र हाच उपाय आहे.
३. विवाह’संस्कार’ संपून जेव्हा विवाह’सोहळा’ साजरा केला जाऊ लागला, तेव्हापासून कुटुंबव्यवस्था मोडकळीस यायला प्रारंभ झाला.
४. आताच्या शिक्षणपद्धतीत पालट करून मन, मेंदू आणि मनगट कणखर बनवणारे शिक्षण द्यायला हवे.
श्री. दादा वेदक यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करतांना बाबरी ढाचा पाडतांनाचे चित्रच उपस्थितांसमोर निर्माण केले. ते म्हणाले, “धर्मसंसदेमध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला प्रारंभ झाला. आता हे आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. केंद्रात भाजप शासन आल्यानंतर २ वर्षे आम्ही राममंदिराच्या निर्माणासाठी वाट पाहिली. अयोध्येमध्ये भव्य राममंदिर निर्माण व्हावे, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न चालू असून येत्या २ ते ३ मासांमध्ये (महिन्यांमध्ये) रामजन्मभूमीविषयीच्या शेवटच्या टप्प्यातील निर्णायक आंदोलनाला संत प्रारंभ करतील.”
क्षणचित्रे
१. आेंकारमंत्राने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
२. श्री. दादा वेदक यांनी उपस्थितांकडून राममंदिर निर्माणाचा उद्घोष करून घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात