Menu Close

अमेरिकेतील हिंदु मतांची शक्ती !

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या ३ नोव्हेंबरला होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सध्या तेथे घडणार्‍या घडामोडी अभूतपूर्व अशाच म्हणाव्या लागतील. अमेरिकेतील यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रचार पूर्णपणे हिंदु मतांभोवती केंद्रित आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. याचा लाभ हिंदूंना होईल, हे निश्‍चित आहे. यासाठी हिंदूंनीही स्वार्थ सोडून भारत आणि हिंदु धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. अमेरिकेत हिंदूंच्या मतांना एकाएकी किंमत आलेली नाही. त्याला मोठी पार्श्‍वभूमी आहे. ती प्रथम जाणून घ्यायला हवी.

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पारडे नेहमीच जड असते, असा आजवरचा अनुभव आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर बिल क्लिंटन, जॉर्ज बूश, बराक ओबामा आदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सलग दोन वेळा राखण्यात यश मिळवले. यंदा मात्र तशी परिस्थिती नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे जरी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष असले, तरी यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अजिबात सोपी नाही, किंबहुना त्यांच्या हातून सत्ता निसटण्याचीच शक्यता खूप अधिक आहे. यामागील कारणे, हीच त्यांच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी आहेत. मागील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, तेच मुळात धक्कादायक होते. त्यापूर्वी फारसा राजकीय प्रभाव नसलेल्या ट्रम्प यांनी तेव्हाच्या निवडणुकीच्या प्रचारात युरोपमध्ये येणार्‍या निर्वासितांचे सूत्र कळीचे बनवून थेट अमेरिकेतील जनतेच्या भावनेला हात घातला. त्यामुळे जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकली. त्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर युरोपीय निर्वासितांच्या प्रश्‍नाचे काय झाले, हे सर्वज्ञात आहे. अमेरिका ही महासत्ता आहे. अनेक देशांत सैन्यशक्ती आणि अर्थशक्ती यांच्या रूपात तिचा थेट हस्तक्षेप आहे. अमेरिकेत जो कुणी राष्ट्राध्यक्ष बनेल, त्याला एका बाजूला अमेरिकेचे प्रश्‍न आणि तिचा हस्तक्षेप असलेल्या देशांतील समस्या, तर दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या महासत्तेला थेट आव्हान देणार्‍या चीनला शह देण्यासाठी दक्षिण आशियावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कसरत करावीच लागते. यासाठी अमेरिकेला भारताशी जवळीक साधणे अनिवार्य असते. ट्रम्प यांना नेमका येथेच म्हणावा तेवढा प्रभाव पाडता आलेला नाही आणि तीच त्यांच्या कारकीर्दीची उतरती कळा ठरत आहे. त्यामागे प्रामुख्याने ट्रम्प यांची नको तितकी आक्रमकता, विद्वेषी स्वभाव, सूडाचे राजकारण, अविचारी निर्णय आणि स्वार्थी धोरणे कारणीभूत आहेत. मागील निवडणुकीत ट्रम्प निवडून आले, त्या वेळी त्यांनी भारतियांना हाकलून देऊन स्थानिकांना रोजगार देण्याची भाषा केली होती. यास तीव्र विरोध झाल्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतली. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात ट्रम्प यांच्याविषयी पहिल्यापासूनच साशंकता आहे. त्यात भरीस भर म्हणून अमेरिकेत काही मासांपूर्वीच घडलेल्या जॉर्ज फ्लॉइड प्रकरणामुळे काळे-गोरे या वादाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आणि अमेरिकेतील बहुतांश राज्यांत दंगली झाल्या. परिणामी कृष्णवर्णियांमध्येही ट्रम्प यांच्याविषयी कमालीची अप्रसन्नता आहे. ट्रम्प यांना निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागण्याचे तेव्हाच निश्तिच झाले होते. अशात पुन्हा सत्तेत येण्याचे ट्रम्प यांच्यासमोर अत्यंत खडतर आव्हान आहे.

ट्रम्प यांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याची प्रचीती तेथे नुकत्याच पार पडलेलेल्या ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’च्या (‘राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमधील निवडणूकपूर्व चर्चासत्रा’च्या) पहिल्याच फेरीत आली.  यात ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात जोरदार वादावादी झाली. इतकेच नव्हे, तर या दोघांनी एकमेकांना उद्देशून ‘शट अप’, ‘मूर्ख’ अशा शब्दांचाही वापर केला. असा प्रकार यापूर्वी कधी तेथे घडलेला नाही. या प्रकारामुळे अमेरिकेतील नागरिकांना धक्का बसला. यंदाच्या या चर्चासत्रांचा खालावलेला स्तर पाहून अनेकांनी चिंता व्यक्त करत ही चर्चा आतापर्यंतची सर्वांत वाईट चर्चा असल्याचे मत मांडले. त्यातच निवडणुकीत पराभूत झाल्यास सत्ता हस्तांतरण करण्यास ट्रम्प यांनी नकार दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच अमेरिकेत संघर्ष अटळ आहे. याचा धसका घेत अमेरिकेतील नागरिकांनी असुरक्षिततेच्या कारणास्तव कॅनडाच्या नागरिकत्वाची वाट धरणे पसंत केले आहे. त्यादृष्टीने हालचालीही चालू झाल्या आहेत. ही घटना म्हणजे अमेरिकेतील मोठ्या अराजकतेची नांदी म्हणावी लागेल. अशा वातावरणात अमेरिकेतील नागरिक ना ट्रम्प यांना मतदान करतील ना बायडेन यांना, असे चित्र आहे. अशी विचित्र परिस्थिती अमेरिकेत यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती.

हिंदूंनी भारत आणि हिंदु धर्म यांचे हित साधावे !

अशात पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प यांना एकगठ्ठा मतांची आवश्यकता आहे. अमेरिकेत हिंदु धर्म हा चौथा सर्वाधिक मोठा धर्म आहे, तर अमेरिकेत भारतियांची संख्या तब्बल २० लाख इतकी आहे. यासाठी ट्रम्प यांना हिंदूंशिवाय पर्याय उरलेला नाही. याकामी त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या राजकीय जवळीकतेचा मोठा लाभ होतांना दिसत आहे. ट्रम्प यांनी ‘हिंदू व्होट्स फॉर ट्रम्प’ या नावाची स्वतंत्र मोहीमच उघडली आहे. त्याद्वारे ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ यांसारख्या हिंदी भाषेतील घोषणाही दिल्या जात आहेत. तीच परिस्थिती डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचीही आहे. बायडेन यांनीही हिंदूंची मते मिळवण्यासाठी स्वतंत्र मोहीम उघडली असून ‘अमेरिका का नेता कैसा हो, जो बायडेन जैसा हो’, यांसारख्या चक्क हिंदी भाषेतील घोषणा देत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. थोड्या कालावधीत बायडेन ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ झाले आहेत. सध्या जनतेचा कौलही त्यांच्याच बाजूने आहे. त्यांच्या पक्षाने कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन हिंदु मते खेचण्याचा प्रयत्न केला आहे. अशात आता अमेरिकेतील हिंदूंनी मतदान करतांना जो भारत देश आणि हिंदुहित साधेल आणि निवडणुकीपूर्वी तसे आश्‍वस्त करेल, अशा उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. तेच त्यांचे स्वराष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती कर्तव्य ठरेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *