मंदिरे सोडून उपाहारगृह, बार यांसह अन्य गोष्टी चालू करणार्या राज्य सरकारचा राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून निषेध
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर राज्य सरकारने मंदिरे सोडून मद्याची दुकाने, ‘मॉल’, क्रिकेट सामने, एस्.टी.बस आणि आता उपाहारगृह अन् बारही चालू केले आहेत. जनतेला मद्याच्या नशेत ठेवण्याचे, तसेच ईश्वराच्या दर्शनापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हे सरकार करत आहे, आम्ही वारकरी याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या जनतेला मद्याहूनही मन:शांतीची आवश्यकता आहे. मन:शांतीसाठी तिला मंदिरांचाच आधार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करून हिंदु धर्माला ऊर्जा दिली. विविध संतांनी जगाला भक्तीमार्ग शिकवला. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात; पण संतांची शिकवण मागील ७० वर्षांत हे सरकार देऊ शकले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात