भारतात प्रतिदिन बलात्काराच्या ८७ घटना घडतात, अशी आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. त्यातही धर्मांधांकडून होणार्या अशा घटनांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. तशी आकडेवारी जरी समोर आली नसली, तरी प्रतिदिन घडणार्या घटना ज्या प्रसारमाध्यमांद्वारे समोर येतात त्याद्वारे तसेच दिसून येते. ‘लव्ह जिहाद’च्या घटनांचा वेगळा उल्लेख असणारी आकडेवारी कोणत्याही संस्थेकडून प्रसारित केली जात नसली, तरी त्याची संख्याही मोठी असणार यात दुमत नाही. उत्तरप्रदेशातील कानपूर येथे अशा एका मागोमाग एक घटना घडल्यावर सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन करून सर्व प्रकरणांची चौकशी करण्यास प्रारंभ केल्यावर १२ हून अधिक घटना तेथे समोर आल्या. कदाचित् अधिक अन्वेषण झाल्यावर ही संख्या वाढूही शकते. म्हणजे एका जिल्ह्यात काही मासांत घडलेल्या या घटना आहेत, तर संपूर्ण देशात किती घटना घडत असतील, याची कल्पना येते. बलात्कारांच्या घटना वगळता विनयभंग, छेडछाड, आक्षेपार्ह टिपण्या करणे, अशा थेट घडणार्या घटनांची संख्या लाखांमध्ये असणार, यात शंका नाही.
प्रसारमाध्यमेही अशा घटनांकडे बातम्या म्हणून पहात नाहीत; कारण त्या नेहमीच्या घटना झालेल्या आहेत. त्यातच एखादी वलयांकित व्यक्ती असेल, अभिनेत्री, खेळाडू, राजकीय नेता, लोकप्रतिनिधी आदी व्यक्ती असतील, तरच त्याला बातमीमूल्य येते आणि ती प्रसिद्ध केली जाते अन्यथा त्यांना कोणतेही मूल्य नसते. यातून समाजाची अशा घटनांकडे पहाण्याची मानसिकता लक्षात येते. ‘रोज मरे त्याला कोण रडे’, अशी एक म्हण आहे. त्यामुळे ‘छेडछाड, विनयभंग आता नेहमीचे आहेत, त्यात काय विशेष’, असा विचार समाज करतो. त्यामुळे पोलीसही त्याला विशेष महत्त्व देत नाहीत. तोच प्रकार भविष्यात बलात्कारांच्या घटनांत होऊ लागला, तर आश्चर्य वाटू नये, असे आता वाटायला लागले आहे. ही स्थिती येऊ नये, यासाठी महिलांवरील कोणत्याही अयोग्य कृतीच्या विरोधात तितक्याच सतर्कतेने आणि कठोरतेने पाहून त्यावर योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्याच्या काळात छेडछाड, अश्लील चित्रे, व्हिडिओ, लिखाण आदींद्वारे सामाजिक माध्यमांतूनही (सोशल मिडियातूनही) महिलांना त्रास देण्याचा प्रकार भारतच नव्हे, तर जगभरात होत आहे. ७१ देशांत काम करणारी संस्था ‘प्लॅॅन इंटरनॅशनल’ने केलेल्या २२ देशांतील सर्वेक्षणातून ‘५ पैकी एका मुलीने सामाजिक माध्यमांचा वापर करणे बंद केले आहे किंवा अल्प केले आहे’, असे समोर आले आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमांतून मुलींवर, तरुणींवर आणि विवाहित अन् वयस्कर महिलांवरही अश्लील शेरेबाजी करणे, अश्लील चित्रे, व्हिडिओ पाठवणे, त्यांच्या छायाचित्रांमध्ये पालट करून ती अश्लील बनवणे, आदी प्रकार घडत आहे. याद्वारे त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. ५८ टक्क्यांपेक्षा अधिक मुलींनी मान्य केले की, त्यांना विविध पद्धतींद्वारे ऑनलाईन गैरवर्तनाचा सामना करावा लागला. २२ टक्के मुलींनी सांगितले, ‘आमच्यावर शारीरिक आक्रमण होईल, याची भीती होती.’ यातून समाज केवळ रस्त्यावरच नाही, तर ऑनलाईन पद्धतीनेही महिलांवर अत्याचार करत आहे. या घटनांकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही, हेही तितेकेच खरे; कारण याविषयी कुणी तक्रार करण्यास जात नाही. तक्रार करून संबंधिताचे अकाऊंट बंद केले, तरी तो दुसरे अकाऊंट चालू करून पुन्हा अशा प्रकारची विकृत कृती करू शकतो. सामाजिक माध्यमांकडून यावर सांगण्यात आले आहे की, ते अशा प्रकारच्या कृत्यांवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. जर असे असते, तर इतक्या मुलींनी सामाजिक माध्यमांचा त्याग केला असता का ? ‘एरव्ही हिंदुत्वनिष्ठांची वैध मार्गाने चालवण्यात येणारी खाती बंद करणारे फेसबूकसारखे माध्यम अशा घटना रोखण्यासाठी तितकी तत्परता का दाखवत नाही ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. सामाजिक माध्यमांचा वापर जिहादी आतंकवादीही करत आहेत. जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याच्या ‘पीस टीव्ही’चे फेसबूक खाते अजूनही चालू आहे, त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही, यातून फेसबूकची निष्क्रीयता लक्षात येते.
मन आणि बुद्धी यांचा विकास हवा !
समाजाची नैतिकता खालावल्यामुळे समाजामध्ये आणि सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटत आहे. याला आळा घालण्यासाठी वरवरचे उपायही नीट केले जात नाहीत. बलात्कार्यांना त्वरित पकडून त्यांना शिक्षा होण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे इतरांवर त्याचा वचक बसत नाही आणि अशी कृत्ये सर्रास चालू रहातात. असे अयोग्य वर्तन करणे चुकीचे आहे, हे ठाऊक असूनही समाजाची वृत्ती तसे करण्याचा प्रयत्न करते, यातून त्यांच्या मन आणि बुद्धी यांची स्थिती लक्षात येते. म्हणजे व्यक्तीचे त्याच्या मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण नसते, असे म्हणावे लागेल. निधर्मी शासनपद्धतीमध्ये समाजाच्या भौतिक आवश्यकता पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जाते. त्यासाठी ‘विकास’ नावाची गोष्ट केली जाते. त्यामुळे भौतिक विकास किती झाला यावरून गाव, शहर, राज्य आणि देश यांच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. आज पाश्चात्त्य देश भौतिक प्रगतीमध्ये भारताच्या कितीतरी पटींनी पुढे आहेत; मात्र तेथे मन आणि बुद्धी यांचा नैतिकदृष्टीने विकास, प्रगती किती झाली आहे ?, हा प्रश्न निर्माण झालेलाच आहे. तेथील अनैतिकतेविषयी लिहू तितके अल्प आहे. भारतही आज त्याच दिशेने किंवा त्यापेक्षाही अधिक अधोगतीकडे चालला आहे, असेच चित्र आहे. हिंदु संस्कृतीच मुळात महिलांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते. महिलांना देवी म्हणून पाहिले जाते; मात्र तोच भाव आज समाजामध्ये नष्ट होत चालला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी व्यक्तीच्या मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवून त्याचा सद्सद्विवेक जागृत ठेवून त्याला आत्मसंयमाद्वारे प्रत्येक गोष्ट करण्याची स्थिती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निधर्मी नाही, तर धर्माधिष्ठित शासनपद्धतीची आवश्यकता आहे. त्याद्वारे समाजाला साधना शिकवण्यात आल्यामुळे केवळ महिलांवरील अत्याचारच नव्हे, तर एकूणच गुन्हेगारी मानसिकता आणि अयोग्य आचरण सुधारून समाज निर्मळ आणि निकोप होईल, यात शंका नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात