Menu Close

तैवानचा ‘स्वतंत्र देश’ म्हणून उल्लेख करू नका !

  • तैवानचे चीनला उत्तर ‘खड्ड्यात जा !’

  • चीनकडून भारतीय प्रसारमाध्यमांना पत्र

भारतीय प्रसारमाध्यमांनी काय करावे आणि काय करू नये, हेही आता चीन शिकवणार का ? भारतीय प्रसारमाध्यमे चीनला नेपाळप्रमाणे त्याची बटीक वाटली का ? या पत्रावर भारतीय प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत चीनला कडक भाषेत फटकारणे अपेक्षित होते. अजूनही त्यांनी ते केले नाही. त्यांनी तत्परतेने चीनला फटकारत तैवान स्वतंत्र देश आहे, हे उघडपणे सांगायला हवे !

नवी देहली : चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी आणि चीनने भारताला तैवानचा १० ऑक्टोबरला असणार्‍या राष्ट्रीय दिनी या प्रदेशाचा उल्लेख ‘स्वतंत्र देश’ म्हणून करू नये, अशी चेतावणी दिली आहे. चीनने भारताच्या प्रसारमाध्यमांना तसे पत्रच पाठवले आहे; मात्र तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका ट्वीटद्वारे चिनी प्रसारमाध्यमे आणि शी जिनपिंग सरकार यांना उत्तर देतांना ‘खड्ड्यात जा’ (गेट लॉस्ट) असे म्हटले आहे.

चीनच्या देहली येथील भारतीय दूतावासाने भारतातील प्रसारमाध्यमांना एक पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, ‘प्रसारमाध्यमांमधील आमच्या मित्रांना आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की, जगभरामध्ये चीनचे प्रतिनिधित्व केवळ चीनमधील पिपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे सरकार करते. त्यामुळेच तैवान स्वतंत्र्य देश असल्याचा उल्लेेख करू नका. या देशातील साई इंग-वेन यांचाही उल्लेेख ‘राष्ट्राध्यक्ष’ असा करू नये. तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. चीनसमवेत राजकीय संबंध असणार्‍या देशांना चीनच्या ‘वन चीन’ (एक चीन) धोरणाची संपूर्ण कल्पना हवी आणि त्यांनी त्याचा सन्मान करावा. भारत सरकारही मागील बर्‍याच काळापासून हेच मान्य करत आले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनीही सरकारप्रमाणे चीनच्या ‘वन चीन’ धोरणाचा स्वीकार करावा. प्रसारमाध्यमांनीही चीनच्या या धोरणाच्या विरोधात जाऊ नये.

चीन सर्व खंडांमध्येच सेन्सॉरशीप लादण्याचा प्रयत्न करत आहे ! – तैवान

चीनच्या या पत्रावर तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करत उत्तर दिले आहे. यात त्याने म्हटले आहे की, भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. येथील प्रसारमाध्यमे ही बहुअंगी असून त्यांना स्वातंत्र्य आवडते; मात्र सध्या कम्युनिस्ट विचारसरणीचा चीन सर्व खंडांमध्येच सेन्सॉरशीप लादण्याचा प्रयत्न करत आहे असे चित्र दिसत आहे. तैवानच्या भारतीय मित्रांकडून चीनला एकच उत्तर मिळू शकते. ते म्हणजे ‘खड्ड्यात जा.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *