Menu Close

देशप्रेमी पत्रकारिता !

‘झीन्यूज’ या वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांना पाकमधील आतंकवाद्यांकडून धमकीचा भ्रमणभाष आला आहे. त्यात पाकच्या विरोधात बोलणे बंद न केल्यास चौधरी यांचाच आवाज बंद करण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘झी न्यूज’च्या संपादकांना अशा प्रकारे धमक्या मिळण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. या आधीही पाकच्या आतंकवादी कृत्यांना उघड केल्यामुळे या वाहिनीला धमक्या दिल्या गेल्या आहेत. एवढेच कशाला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद यानेही पाकमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘झी न्यूज’च्या नावाने थयथयाट केला होता. ‘झी न्यूज’वर रात्री ९ वाजता चौधरी यांचा ‘डी.एन्.ए.’ हा कार्यक्रम भारतभरात लोकप्रिय आहे.

भारतीय पत्रकारितेची पत दिवसेंदिवस खालावत असतांना ‘डी.एन्.ए.’चा कार्यक्रमातून चौधरी यांची संयत पत्रकारिता उठून दिसते. ‘काश्मीरमधील आतंकवादी संघटना आणि त्यांना धर्मांधांकडून मिळत असलेले साहाय्य’, ‘धर्मांधांनी हिंदूंच्या विरोधात पुकारलेला जिहाद’, ‘जिहादचे विविध प्रकार’, ‘भारतातील धार्मिक दंगलींमागील सत्य’ आदी विविध विषयांना ‘झी न्यूज’ने वाचा फोडली. भारतातील बहुतांश वृत्तवाहिन्या या कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु नेते, हिंदु धर्म यांच्या नावाने खडे फोडण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत केवळ भारतातच नव्हे, तर इस्लामी देशांमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर प्रकाश टाकणारे ‘झी न्यूज’चे कार्य कौतुकास्पद वाटते. ज्या काळात ‘हिंदू’, ‘हिंदुत्व’ किंवा ‘हिंदु धर्म’ हे शब्द उच्चारणे हीच ‘धर्मांधता’ समजली जात असतांना ‘झी न्यूज’ने हिंदूंना धर्मांधांमुळे भेडसावणार्‍या समस्यांच्या विरोधात आवाज उठवला. ‘झी न्यूज’च्या ‘डी.एन्.ए.’ कार्यक्रमात अन्य वृत्तवाहिन्यांवर दिसतो, त्याप्रमाणे कुठेही आरडाओरडा, आक्रस्ताळेपणा नसतो. निवेदक असणारे चौधरी त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी हातवारे करून बोलत नाहीत अथवा मोठ्या आवाजातही त्यांचे म्हणणे मांडत नाहीत. एखाद्या घटनेविषयी काहीतरी निष्कर्ष काढण्याऐवजी ते दर्शकांसमोर तथ्ये मांडतात आणि काय योग्य किंवा अयोग्य हे त्यांच्यावर सोपवतात. त्यामुळे हल्लीच्या पत्रकारितेपेक्षा सुधीर चौधरी यांच्या पत्रकारितेतील वेगळेपणा लोकांना भावतो. ‘या वृत्तवाहिनीला आणि तिच्या संपादकांना धमक्या मिळत असतांना संबंधितांवर काय कारवाई केली ?’ किंवा ‘धमक्या देणार्‍यांना अजूनही गजाआड का केले नाही ?’, या प्रश्‍नांची उत्तरे सरकारने द्यायची आहेत. एक मात्र खरे की, एखाद्या वृत्तवाहिनीच्या वाक्बाणांमुळे शत्रूराष्ट्रातील आतंकवाद्यांचा तीळपापड होत असेल, तर हे पत्रकारितेचे यश आहे. लोकशाहीचा चौथा खांब डळमळीत होत असतांना ‘झी न्यूज’सारख्या वृत्तवाहिन्यांकडून होणारे वृत्तांकन हे ‘काळ्या ढगाला सोनेरी किनार’ असेच म्हणावे लागेल.

आक्रमक विरुद्ध संयत पत्रकारिता !

‘माल दर्जेदार असो किंवा नसो, वरचे वेष्टन आकर्षक पाहिजे’, हे उद्योग-धंद्यात नफा कमवण्यासाठी महत्त्वाचे सूत्र मानले जाते. सध्या धंदेवाईक पत्रकारितेतही हे सूत्र पाळले जाते. कोणतीही घटना तिखट-मसाला लावून लोकांच्या माथी मारण्याचा निंदनीय प्रकार सध्या काही वृत्तवाहिन्यांवर चालू आहे. ‘आक्रमक’ अंदाजाने स्वतःचे म्हणणे लोकांच्या गळी उतरवता येऊ शकते’, असा अपसमज वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणार्‍यांना निर्माण झाल्यामुळे त्यांवरील कार्यक्रमांना हिडिस रूप प्राप्त झाले आहे. अन्यायाच्या विरोधात आक्रमकपणे बोलणे अथवा लिहिणे, यात चुकीचे असे काहीच नाही; मात्र या आक्रमकतेला सद्सद्विवेकबुद्धीचा लगाम हवा. तो नसेल, तर स्वतःवरील संयम सुटतो आणि अनागोंदी माजते. अशीच अनागोंदी आज अनेक वृत्तवाहिन्यांवर दिसून येत आहे. तत्त्वनिष्ठता, सदाचार, शालीनता हे गुण पत्रकारितेतून कधीच लुप्त झाले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आदी स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी पत्रकारिता केली, तीही आक्रमक होती; मात्र त्याला नीतीमत्तेचे, शालीनतेचे कोंदण होते. त्यामुळे त्यांची पत्रकारिता भरकटली नाही. या सर्वांनाच आत्मभान असल्यामुळे ते पत्रकारितेद्वारे लोकजागृती करू शकले. चोहोबाजूंनी बिकट परिस्थिती असतांना आणि समाज निद्रिस्त असतांना निवळ शब्दांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्फुरण किंवा नवचेतना भरणे हे अतिशय कठीण असते, हे लक्षात घ्या. तरीही या सर्वांनी हे दिव्य लीलया पार पाडले. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या मानाने आजची स्थिती तशी चांगली आहे; मात्र हल्लीचे पत्रकार हे स्वकेंद्री असल्याने सर्वच ताळतंत्र सुटले आहे.

देशद्रोही पत्रकारितेला लगाम हवा !

अलीकडेच देहली येथे पत्रकार राजीव शर्मा यांना चीनसाठी हेरगिरी करतांना अटक करण्यात आली, तर काही दिवसांपूर्वी केरळ येथील पत्रकार सिद्दिकी कप्पन याला पोलिसांनी आतंकवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत अटक केली. कप्पन हा ज्या संकेतस्थळाचा संचालक होता, त्याद्वारे भारतात दंगली भडकावण्यासाठी ‘दिशादर्शन’ करण्याचे काम केले जात होते, तसेच त्याला आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून निधी पुरवला जात होता. मुळात या दोन्ही घटना गांभीर्याने घेऊन त्याला सर्वच वृत्तवाहिन्यांवरून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे आवश्यक होते; कारण यापूर्वी पत्रकारिता भ्रष्ट झाली किंवा नीतीशून्य झाल्याचे दिसत होते; मात्र या घटनांतून पत्रकारिता क्षेत्रात देशद्रोह्यांचा शिरकाव झाल्याचे समोर येते. पत्रकारितेतील हे अधःपतन थांबवण्यासाठी या क्षेत्रातील लोकांनीच पुढे येणे आवश्यक आहे.

सध्या पत्रकारितेतही दोन गट दिसून येतात. एक देशहितार्थ पत्रकारिता करणारे, तर दुसरा गट सरळ सरळ देशविरोधी भूमिका घेणारे. देशहितार्थ पत्रकारिता करतांना जिवावर बेतू शकते, हे ‘झी न्यूज’च्या संपादकांना मिळणार्‍या धमक्यांवरून दिसून आले. देशप्रेमी पत्रकारिता करणार्‍यांच्या पाठीशी देशप्रेमी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना आश्‍वस्त करणे आवश्यक आहे. अशांना पूर्ण संरक्षण देऊन त्यांचे रक्षण करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. दुसरे म्हणजे देशविरोधी पत्रकारिता करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ राबवण्याची हीच योग्य वेळ आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *