स्वातंत्र्यापूर्वी परकियांकडून आणि पुढे भारताच्या फाळणीनंतरही चालू असलेली हिंदु मंदिरांवरील आक्रमणे अद्यापही चालू आहेत. आज देशात कोणत्याही आक्रमकांचे राज्य नाही. सध्या आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदु मंदिरांवर मोठ्या संख्येने आक्रमणे होत आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये मे २०१९ मध्ये ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी यांचे सरकार सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या वाढली आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये एकप्रकारे ख्रिस्ती धर्मप्रचाराला राजाश्रय मिळाला आहे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहे.
संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१. बहुसंख्य हिंदूंच्या भारतात हिंदु मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित !
भारताच्या इतिहासात मोगल आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणे आणि त्यांना लुटून विध्वंस करणे आदी अनेक घटनांचा उल्लेख आहे. मोगलांच्या पश्चात गोवा आदी प्रदेशांमध्ये ख्रिस्ती पाद्री फ्रान्सिस झेविअरच्या मागणीनुसार ‘इन्क्विझिशन’ झाले, त्यातही हिंदु मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळीही हिंदु मंदिरांवर आक्रमणे चालू होती. त्यानंतर वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादाचा एक नवीन काळ चालू झाला. त्या काळातही तेथील हिंदूंवर प्रचंड अत्याचार करण्यात आले आणि हिंदु मंदिरांसह तेथील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे हिंदु बहुसंख्य असणार्या भारतात हिंदु मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२. आंध्रप्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताकाळात हिंदु मंदिरांवरील आक्रमणांमध्ये वाढ !
आज देशात कोणत्याही आक्रमकाचे राज्य नाही, तसेच सत्तेमध्ये येणार्या नवीन सरकारला सर्व नागरिकांच्या श्रद्धा आणि उपासना यांचे समभावाने रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते; परंतु घटनादत्त सरकारे असतांनाही आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदु मंदिरांवर मोठ्या संख्येने आक्रमणे होत आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये मे २०१९ मध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी यांचे सरकार सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या वाढली आहे. मागील काही मासांमध्ये राज्यात १८ मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली. यावरून ‘गोव्याच्या ‘इन्क्विझिशन’ नंतर आता आंध्रप्रदेशमध्ये ‘इन्क्विझिशन’ चालू झाले आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित होतो.
३. आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचाराला राजाश्रय !
अ. आपल्याला लक्षात घेतले पाहिजे की, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीचे पती अनिल कुमार हे राज्याचे प्रसिद्ध ‘इवेंझेलिस्ट’ (ख्र्रिस्ती प्रचारक) आहेत. ते ‘अनिल वर्ल्ड इवेंझेलिझम’ नावाची संघटना चालवतात. एक हिंदु ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले अनिल कुमार यांनी जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस्. शर्मिला रेड्डी यांच्याशी विवाह केल्यानंतर ख्रिस्ती पंथ स्वीकारला. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, ‘मला लहान गावांमध्ये ख्रिस्ती प्रचार करायला आवडतो. तसेच गावांमध्ये लहान लहान चर्च उभारणे, हा माझा उद्देश आहे.’
आ. ख्रिस्ती प्रचारासाठी अनिल कुमार यांना ‘डोनेशन’ मिळते आणि काही न्यून पडत असेल, तर व्यावसायिक असणार्या रेड्डी कुटुंबाकडून त्यांना अर्थसाहाय्य केले जाते. त्यांना आंध्रप्रदेशच्या ख्रिस्ती संघटना सन्मान देतात आणि असेही म्हणतात की, जगनमोहन रेड्डी यांच्या सत्तेतील पुनरागमनामागे ख्रिस्ती लोकसंख्येत वाढ करणारे अन् ख्रिस्त्यांची ‘व्होट बँक’ बनवणारे अनिल कुमार यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत आहेत.
इ. फेब्रुवारी २०२० मध्ये आंध्रप्रदेशातील सर्व पाद्य्रांच्या बैठकीमध्ये (‘दैव सेवाकुला सदस्यु’मध्ये) अनिल कुमार यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही केवळ पाद्य्रांची बैठक असतांनाही त्यात मुख्यमंत्री रेड्डी यांच्या वाय.एस्.आर्. काँग्रेसचे आमदार के. भाग्यलक्ष्मी आणि सेट्टी फाल्गुना हे अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. याला धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचे पालन म्हणता येईल का ?
उ. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तर हज यात्रेप्रमाणे जेरूसलेमच्या यात्रेसाठी ख्रिस्त्यांनाही अनुदान देण्याची घोेषणा केली आणि त्यांच्या ‘मतपेढी’ला चुचकारण्याचे काम केले. जेव्हा राजसत्ताच धर्मनिरपेक्षता सोडून एका पंथाच्या प्रचाराच्या साहाय्यामध्ये सहभागी होत असेल, तर आंध्रप्रदेशातील हिंदूंना न्याय कसा मिळणार ? जेव्हापासून हे सरकार आले, तेव्हापासून हिंदु मंदिरांवरील आक्रमणांची शृंखला चालू आहे.
४. आंध्रप्रदेशमध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणांची काही उदाहरणे
अ. फेब्रुवारी २०२० मध्ये नेल्लोरमध्ये प्रसन्ना वेंकटेश्वर मंदिरातील रथ जाळण्यात आला.
आ. गुंटूर जिल्ह्यातील रोमपीचेरला गावामध्ये श्रीवेणुगोपाल स्वामी मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
इ. कृष्णा जिल्ह्यातील वत्सवई मंडलमधील मककपेटा गावामध्ये ऐतिहासिक काशी विश्वेश्वर स्वामी मंदिरातील नंदीची मूर्ती तोडण्यात आली.
ई. आंध्रप्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यात अंतरवेदी येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर आहे. ६ सप्टेंबर २०२० या दिवशी तेेथील ६२ वर्षे जुन्या असलेल्या रथाला आग लावून तो नष्ट करण्यात आला.
उ. चित्तूर जिल्ह्यात अगारा मंगलम् गाव आहे. २७ सप्टेंबर २०२० या दिवशी या गावातील शिवमंदिरावर आक्रमण करून नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
ऊ. कृष्णा जिल्ह्यातील निदामनुरू गावात एक मूर्ती तोडण्यात आली. त्यानंतर विजयवाडातील कनकदुर्गा मंदिरात चोरी झाली आणि रथाचे ३ चांदीचे सिंह चोरून नेण्यात आले.
५. हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या संदर्भात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारची निष्क्रीयता कि गुन्हेगारांना प्रोत्साहन ?
वरील काही घटना आहेत, ज्यात आंध्रप्रदेशमध्ये हिंदु मंदिरांना लक्ष्य करून आक्रमण करण्यात आले; परंतु सरकारने ही आक्रमणे गांभीर्याने घेतली नाहीत. जेव्हा मूर्तींची तोडफोड, मंदिरातील प्राचीन रथ जाळला जाणे आदी गोष्टी होत आहेत, तेव्हा यामागे चोरी करण्याचा उद्देश निश्चितच नाही. मागील काही मासांमध्ये अशा १८ घटना उघड झाल्या; पण एकाही घटनेत ना दोषी मिळाला, ना त्यांचे अन्वेषण झालेे. जगनमोहन रेड्डी यांच्या संदर्भात हे प्रथमच घडत आहे, असे नाही. ते सत्तेत आले, तेव्हाच ‘ख्रिस्ती धर्मांतराला प्रोत्साहन मिळत आहे’, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि मिशनरी संघटना यांच्याकडून राज्यात अनाकलनीय वातावरण निर्माण करण्यात आले आहे. राज्यात ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी जगनमोहन रेड्डी यांनी पावले उचलली असून त्याला ते संरक्षण देत आहेत आणि हिंदु मंदिरांवरील आक्रमणांविषयी सोयीस्करपणे गप्प बसून आहेत. कदाचित् हिंदु मंदिरांवर वारंवार आक्रमणे होणे, हा याचाच परिपाक आहे. मंदिरांवरील आक्रमणांच्या प्रकरणी काही कारवाई होणे, तर लांब राहिले; पण आंध्र सरकारच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक प्रकरणाचे मंत्री कोडाली नानी यांनी मंदिरांवरील आक्रमणाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘मूर्ती बेपत्ता झाल्या, तर काय झाले ? मूर्तींची तोडफोड करण्यात येत असेल, तर त्याचा परिणाम देवतांवर तर होणार नाही ना ?’’
६. दोषींना शिक्षा मिळण्यासाठी वाय.एस्.आर्.काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक !
एखाद्या मशिदीवर किंवा चर्चवर एक दगड जरी पडला, तरी देशाची ‘सेक्युलर’ प्रसारमाध्यमे आकाश डोक्यावर घेतात; परंतु हिंदु मंदिरांवर लागोपाठ आक्रमणे होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांनाही सोयीस्करपणे पाळलेल्या मौनाच्या आडून हिंदुत्वाच्या विरोधात मोहीम चालवली जात आहे. राज्य सरकार ख्रिस्तीकरणाच्या रक्षणाचे कार्य करत असेल, तर केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि मंदिर आक्रमणांतील दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.