Menu Close

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या ‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजीच्या ‘By Attacking the Mughals, Adityanath Is Erasing the History of His Own Nath Samprady’ या मथळ्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी ‘मुघल म्युझियम’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे करण्याची घोषणा केली, यावर टीका करणार्‍या या लेखात ‘छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे हिंदु राष्ट्रवादाच्या अतिरेकी हिंदुत्वाचे सर्वात आवडते प्रतिक’ असे म्हटले आहे. हे लिखाण अत्यंत निंदनीय असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अवघ्या हिंदु समाजाला दैवतासमान असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करणार्‍या ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संपादक, मालक आणि पत्रकार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

श्री. शिंदे यांनी सांगितले की, या विरोधात मुंबईत विक्रोळी येथे श्री. प्रभाकर भोसले यांनी, तर अमरावती येथे श्री. रोशन मुळे यांनी, रायगड येथे श्री. रोहिदास शेडगे यांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटीया, एम.के. वेणु आणि लेखिका क्रिस्टीन मारेवा कारवोस्की यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, २९५ अ आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना त्वरीत अटक करावी, असे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारे केला गेलेला अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *