गेल्या २ दिवसांपासून तनिष्कच्या विज्ञापनामुळे वादंग उठला आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंना संकुचित, तर मुसलमानांना उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कोणती धर्मनिरपेक्षता आहे ? प्रत्येक वेळी विज्ञापन असो, चित्रपट असो किंवा वेब सिरीज असो, त्यात महिला पात्र हे हिंदु, तर पुरुष पात्र हे नेहमी मुसलमानच का दाखवले जाते ? हा योगायोग नसून हे लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली. ‘अशा विज्ञापनांमधून तनिष्कने मुसलमान महिला आणि हिंदु पुरुष, असे दाखवण्याचे धाडस दाखवले असते का ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वीही ‘रेड लेबल’ चहाच्या विज्ञापनात, तसेच होळीच्या वेळी ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनात अशीच ‘धर्मनिरपेक्षता’ दाखवून हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीकडूनही आम्ही या विज्ञापनाला वैध मार्गाने विरोध केलेला आहे. २ दिवसांत संपूर्ण भारतभरामध्ये हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांद्वारे केलेल्या जागृतीचा परिणाम म्हणजे या विज्ञापनामुळे टाटा ग्रुपची २ सहस्र ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. यावरून तरी अशी विज्ञापने दाखवणार्या आस्थापनांनी बोध घेऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस करू नये.’’