तीव्र आंदोलनाची चेतावणी
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते अक्षय कुमार यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे नाव हेतूतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. एकीकडे हिंदु देवतेचा अपमान करणारे ‘लक्ष्मी फटाके’ बंद करण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रबोधन करत असतांना, या चित्रपटाच्या नावामुळे त्यास पुन्हा प्रोत्साहनच मिळणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात नायकाचे नाव ‘आसिफ’, तर नायिकेचे नाव ‘प्रिया यादव’ असल्याचे दिसत आहे. अर्थात् त्यातून मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांचे संबंध दाखवून हेतूतः ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच दिले आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की,
१. एकीकडे ‘महंमद : दी मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटामुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात; म्हणून त्यावर स्वतः नोंद घेऊन लगेच बंदीची शिफारस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावरही सरकारने बंदीची शिफारस करावी, अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
२. या चित्रपटाच्या विज्ञापनामध्ये (‘ट्रेलर’मध्ये) अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते, तसेच मोठे लाल कुंकू, लाल साडी, केस मोकळे सोडणे, हातात त्रिशूळ घेऊन नाचणे, हे जणू देवीचेच रुप असल्याचे भासवण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे. दिवाळीच्या निमित्ताने ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाने चित्रपट काढणारे कधी ईदच्या निमित्ताने ‘आयेशा बॉम्ब’, ‘शबीना बॉम्ब’, ‘फातिमा बॉम्ब’ नावाने चित्रपट काढण्याचे धाडस करतील का ? मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा विचार चित्रपट निर्माते आणि शासनकर्ते करतात, तसा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार का करत नाहीत ? हिंदूंशी पक्षपाती वागणे, हीच सर्वधर्मसमभावाची व्याख्या आहे का ? हिंदुविरोध हेच जणू सध्याचे ‘सेक्युलरीझम’ झाले आहे.
३. या चित्रपटाच्या निर्मात्या शबीना खान आणि लेखक फरहद सामजी असल्याने हेतूतः ते हिंदुद्वेष पसरवत असल्याचे लक्षात येते. तरी या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी श्री. शिंदे यांनी या वेळी दिली आहे.