श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशिदीच्या अतिक्रमणाचे प्रकरण
सर्व विरोधी पक्षकारांना बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडून नोटीस
मथुरा (उत्तरप्रदेश) : येथील जिल्हा न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशिदीच्या अतिक्रमणाच्या संदर्भातील श्रीकृष्ण विराजमान यांची याचिका स्वीकारली आहे. तसेच सर्व विरोधी पक्षकारांना नोटीस पाठवून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. याची पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. या याचिकेद्वारे ‘श्रीकृष्णजन्मभूमीची एकूण १३.३७ एकर भूमी श्रीकृष्ण विराजमानची असून ती त्याला परत मिळावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी ही याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळली होती. याचिकाकर्त्याने ही याचिका वरिष्ठ पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांच्या माध्यमातून प्रविष्ट केली आहे.
१. या याचिकेनुसार सध्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद आहे. तेथे कंस याचे कारागृह होते आणि तेथेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. येथे पूर्वी श्रीकृष्ण मंदिर होते. मोगलांनी ते पाडून ईदगाह मशीद बांधली.
२. दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले होते की, वर्ष १९६७ मध्ये या वाद समाप्त झालेला आहे, तसेच वर्ष १९९१च्या ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्यामध्ये हे मंदिर असल्याने यावर सुनावणी करता येऊ शकत नाही.
३. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’मध्ये हे मंदिर येत नाही, त्यामुळे यावर सुनावणी व्हायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात