आज निज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् १७ ऑक्टोबर २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीचा १८ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने…
हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
गेल्या १८ वर्षांत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने जी गरूडझेप घेतली, त्याचे प्रेरणास्रोत म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! त्यांच्याच कृपाशीर्वादाने हिंदु जनजागृती समितीचे कार्य आज देश-विदेशांत पोचले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार सर्वप्रथम मांडला आणि त्यातून प्रेरणा घेऊनच समिती कार्यरत आहे. म्हणूनच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, असा विश्वास निर्माण झाला आहे. परात्पर गुरुदेवांनी आमच्याकडून या कार्याच्या माध्यमातून साधना करवून घ्यावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम !
– श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती.
हिंदु जनजागृती समितीचा आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१७ ऑक्टोबर २०२० या दिवशी) अर्थात् शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनी १८ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या राष्ट्रव्यापी कार्याचा मागोवा घेणारा लेख !
‘हिंदु जनजागृती समिती ! आज हे नाव केवळ देशातील काही राज्यांपुरते मर्यादित नसून देशाच्या कानाकोपर्यांत, तसेच विदेशांतही पोचले आहे. देशातील अग्रगण्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सूचीत समितीचे नाव घेण्यात येते. लाखो हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र अन् हिंदु राष्ट्र यांविषयीचा अभिमान आणि प्रेम निर्माण करण्यात समितीला यश आले आहे. असंख्य धर्मप्रेमी हिंदूंनी समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाच्या धर्मनिष्ठ कार्याला आरंभ केला आहे, तर शेकडो हिंदुत्वनिष्ठ नेते, धर्मप्रेमी आणि कार्यकर्ते ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. साधना केल्याने ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालेल्या सहस्रो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समितीचे चालू असलेले आदर्शवत् असे धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आणि हिंदुत्वरक्षण यांचे कार्य पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठ विचारवंत, अधिवक्ते, उद्योजक, पत्रकार यांच्यासह सहस्रो हिंदूंच्या मनात ‘भरतखंड हिंदु राष्ट्राची पहाट लवकरच पाहील’, असा विश्वास निर्माण झाला आहे. ‘अल्पावधीत वृद्धिंगत झालेल्या समितीच्या राष्ट्रव्यापी कार्याचे गमक काय ?’, असे समितीच्या कार्यकर्त्याला विचारल्यास ‘हे कार्य ईश्वरी कृपा आणि समाजातील अनेक संतांचे मिळालेले आशीर्वाद यांमुळेच शक्य होत आहे’, असे तो कार्यकर्ता विनम्रतापूर्वक सांगील.
१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची मुहूर्तमेढ !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मावळ्यांचे प्रभावी संघटन केले आणि ‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’, अशा श्रद्धेने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याचप्रमाणे संघटना, संप्रदाय, जात आदींचे बंध दूर सारून हिंदूसंघटन करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) निर्मितीसाठी घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (७ ऑक्टोबर २००२) या दिवशी चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे ‘हिंदु जनजागृती समिती’ची उत्स्फूर्तपणे मुहूर्तमेढ रोवली गेली. नाटके, चित्रपट, विज्ञापने आणि अन्य माध्यमे यांद्वारे होणारे देवता अन् संत यांचे विडंबन रोखणे, धर्मावरील आघातांविषयी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि धर्माचरण शिकवून त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करणे यांसह समाजाला राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यांची जाणीव करून देऊन आदर्श समाजनिर्मिती करणे यांसाठी समिती गेली १८ वर्षे अथकपणे कार्यरत आहे.
२. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म कार्य !
अ. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन, तसेच जिल्हा, प्रांत आणि राज्यस्तरीय अधिवेशने
हिंदु धर्मावर होणार्या आघातांविरुद्ध देशभरातील शेकडो लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही आपापल्या स्तरावर हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. या आघातांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच अंतिम उत्तर आहे, हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आदींचे संघटन करून वर्ष २०१२ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन केले. यंदा दळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊन’च्या) काळात ऑगस्ट २०२० मध्ये नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन ‘ऑनलाईन’ पद्धतीने पार पडले. त्यास हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करणार्यांचे संघटन करण्याच्या दृष्टीने जिल्हा, प्रांत आणि राज्य स्तरांवर हिंदुत्वनिष्ठांचे संघटन व्हावे, यासाठी जिल्हा, प्रांत आणि राज्य स्तरांवर हिंदु राष्ट्र अधिवेशनांचे आयोजन करण्यात येते. समितीच्या वतीने आतापर्यंत जिल्हास्तरीय ४३, प्रांतीय ५८, तर राज्यस्तरीय १२ अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आज हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष यांच्यावरील आघातांविरुद्ध देशभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने आंदोलने करत आहेत. सद्यःस्थितीत हिंदूंच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. हिंदूंच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतभरातील हिंदूंचा संघटित आवाज शासनापर्यंत पोचावा, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन हे व्यासपीठ हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या माध्यमातून निर्माण झाले. या आंदोलनांचे वैशिष्ट्य म्हणजे ती देशातील अनेक शहरांमध्ये एकाच दिवशी करण्यात येतात. आजपर्यंत विविध विषयांवर १ सहस्र ७०७ राष्ट्रीय हिंदू आंदोलने झाली आहेत.
हिंदु राष्ट्र अधिवेशनांच्या माध्यमातून राष्ट्र-धर्म प्रेमी पत्रकारांचे संघटन असलेल्या ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’ची स्थापना झालेली आहे. त्याद्वारे हिंदूंचे सण, उत्सव, व्रते, धार्मिक विधी यांची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित विषयावरील बातम्यांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाते.
इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा
हिंदूंवरील आघातांविषयी हिंदूंमध्ये जागृती करावी आणि हे आघात वैध मार्गाने रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उदात्त हेतूने समितीने देशातील अनेक राज्यांमध्ये ठिकठिकाणी, जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर १ सहस्र ८९६ हिंदु राष्ट-जागृती सभांचे यशस्वी आयोजन केले. सभांमुळे गावागावांतील हिंदू संघटित झाले. अनेक गावांतील युवकांनी साधना चालू केली, ते धर्माचरणी बनले, अनेकांचे व्यसन सुटले, तसेच त्यांचे आपापसांतील मतभेद दूर होऊन ते संघटित झाले. हिंदूसंघटनासाठी धडपडणार्या हिंदु जनजागृती समितीला याहून निराळी कोणती फलनिष्पत्ती अपेक्षित असू शकेल ?
ई. धर्मशिक्षणवर्ग
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि साधनेचा अभाव यांमुळे आज हिंदू स्वत:ला ‘हिंदु’ म्हणवून घेण्यासही लाजतात. यामागील मूळ कारण म्हणजे हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा तीव्र अभाव ! हे लक्षात घेऊन समिती धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन करते. या माध्यमातून धार्मिक कृती, साधना, राष्ट्रासमोरील समस्या इत्यादी विषयांवर हिंदूंमध्ये जागृती करण्यात येते.
दळणवळण बंदीच्या काळात, तसेच सध्या समितीचे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजमितीस एकूण ३२२ ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू असून त्याद्वारे सहस्रो जिज्ञासू त्याचा लाभ घेत आहेत.
उ. देवतांचे विडंबन रोखणे
नाटके, विज्ञापने, चित्रपट, वेष्टने या माध्यमांतून होणार्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या शेकडो प्रकरणांच्या विरोधात समितीने वैध मार्गाने आवाज उठवला. त्यामुळे अनेक प्रकरणांत (उदा. हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी अश्लाघ्य स्वरूपात रेखाटलेली देवतांची चित्रे, ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटातील देवतांचे विडंबन) देवतांचे विडंबन थांबवण्यात समितीला यश प्राप्त झाले. समिती देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आजही आवाज उठवते. समितीचे संकेतस्थळ, फेसबूक, टि्वटर यांद्वारे देवतांच्या विडंबनाच्या ४०० हून अधिक घटना वैध मार्गाने रोखल्या.
ऊ. ‘जागो हिंदू’ संदेश
समिती प्रतिदिन समाज, राष्ट्र्र अन् धर्म यांवरील आघातांचे वृत्त आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोन व्हॉट्सअॅपद्वारे ‘जागो हिंदू’ संदेशाच्या माध्यमातून १० लाखांहून अधिक हिंदूंपर्यंत पोचवते. आपणही प्रतिदिन हा संदेश स्वतःच्या भ्रमणभाषद्वारे नातेवाईक, मित्र आदींना पाठवून धर्मकार्यात सहभागी होऊ शकता.
ए. सुराज्य अभियान आणि आरोग्य साहाय्य समिती
वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर समितीने सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने संघर्ष करण्यासाठी ‘सुराज्य अभियान’ आरंभले. आज सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार माजला आहे. सर्वांच्या मनात याविषयी चीड आहे; पण ‘त्याविरोधात काय करायचे ?’, ही दिशा ठाऊक नसल्याने याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग व्हावे लागते. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात घटनात्मक मार्गाने लढा देणे आणि जनमानसांत जागृती करणे, हे अभियानाचे मुख्य कार्य आहे.
वर्ष २०१८ मध्ये अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात आरोग्य साहाय्य समिती या उपक्रमास आरंभ केला. आरोग्य क्षेत्रातील अन्याय, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध वैध मार्गाने लढणे, तसेच चांगले आधुनिक वैद्य (डॉक्टर), पारिचारिका, तंत्रज्ञ यांचे संघटन हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समितीने सुराज्य अभियान तथा आरोग्य साहाय्य समिती अंतर्गत महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, तसेच इंधन अन् अन्न यांतील भेसळ आदींविषयी आवाज उठवला. अधिक दराने वसुली करणार्या रुग्णालयांविरुद्ध, तसेच उद्योग, कारखाने यांमुळे होणार्या जलप्रदूषणाविषयी तक्रारी केल्या आहेत.
ऐ. प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रम
समाज आणि राष्ट्र यांच्या प्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. यासाठी समितीने हा उपक्रम चालू केला आहे. दळणवळण बंदीच्या काळात प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग उपक्रम हा ‘ऑनलाईन’ घेतला जात आहे. याला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. आजमितीस समितीच्या वतीने १४३ प्रथोमपचार प्रशिक्षणवर्ग चालू असून त्याचा ३ सहस्र लोक लाभ घेत आहेत.
ओ. स्वरक्षण प्रशिक्षण आणि शौर्य जागरण उपक्रम
खून, दरोडे, बलात्कार, खंडणी अशांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आज स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे काळाची आवश्यकता आहे. यासाठी समितीच्या माध्यमातून विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग उपक्रम राबवला जातो. सध्या दळणवळण बंदीच्या काळात ७० स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग ‘ऑनलाईन’ स्तरावर चालू आहेत. शौर्य जागरण उपक्रमाच्या माध्यमातून हिंदूंचे पराक्रमी राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांच्या इतिहासाचा जागर केला जातो, तसेच विजयादशमी, शिवजयंती यांसारखे शौर्यजागरण करणारे उत्सव साजरे केले जातात.
औ. उद्योगपती परिषद
‘उद्योगपती परिषद’ हे राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ व्यावसायिक, व्यापारी अन् उद्योगपती यांचे संघटन आहे. जून २०१८ मध्ये सप्तम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’त या परिषदेची स्थापना झाली आहे.
अं. ग्रंथसंपदा
हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्यासाठी समितीने विविध ग्रंथांचे संकलन केले आहे. यात हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘गोसंवर्धन’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर आणि धर्मांतरितांचे शुद्धीकरण, ‘देवनदी गंगेचे रक्षण करा !’, ‘भोंदू बाबांपासून सावधान !’ ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ या ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथांद्वारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक सुस्पष्टता निर्माण होण्यास साहाय्य झाले.
क. राष्ट्ररक्षणाचे कार्य
भारताच्या नकाशाच्या विद्रुपीकरणाला सनदशीर मार्गाने विरोध करणे, राष्ट्रगीताचा, तसेच ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, ही प्रबोधनपर चळवळ राबवणे पाठ्यपुस्तकांतून होणारा राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण यांविरोधात वैध आंदोलने करणे, हे समितीच्या माध्यमातून केले जाते.
ख. संस्कृतीरक्षणाचे कार्य
‘व्हॅलेंटाईन डे’, फ्रेंडशिप डे’, अशा कुप्रथांच्या विरोधात समिती गेली अनेक वर्षे जनप्रबोधन, तसेच हिंदु संस्कृतीनुसार आचारपालन करण्याविषयी (उदा. स्नान, वेशभूषा, आहार इत्यादी) मार्गदर्शन करते.
ग. समाजसाहाय्याचे कार्य
समितीच्या माध्यमातून मंदिर स्वच्छता, रक्तदान शिबिरे, पूरग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना प्रत्यक्ष साहाय्य करणे, विविध कुंभमेळे, तसेच गावोगावच्या जत्रांच्या सुनियोजनाचे कार्य करणे, पुण्यात धूळवड आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ राबवून हा जलाशय प्रदूषित होण्यापासून वाचवणे, वृक्षारोपण करणे आदी समाजसाहाय्य केले.
कोरोनाच्या काळात बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांना समितीच्या वतीने चहा आणि अल्पाहार देण्यात आला.
३. सामाजिक माध्यमातून विश्वव्यापी हिंदूसंघटन !
अ. संकेतस्थळ : हिंदु जनजागृती समितीचे www.HinduJagruti.Org हे संकेतस्थळ आज हिंदूंसाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. हे संकेतस्थळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कार्यरत असून प्रतिमास २ लाखांहून अधिक वाचक याला भेट देतात. समितीच्या सर्व मोहिमा या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण जगभरात पोचतात.याच्या माध्यमातून समितीच्या कार्याशी ४८ सहस्रांहून अधिक लोक जोडले गेले आहेत.
आ. यू-ट्युब चॅनल : समितीच्या youtube.com/HinduJagruti या यू-ट्युब चॅनलला हिंदूंचा भरघोस प्रतिसाद असून आजपर्यंत ६१ लाखांहून अधिकांनी त्यास भेट दिली आहे.
इ. फेसबूक : हिंदु जनजागृती समितीच्या facebook.com/HinduAdhiveshan या अधिकृत फेसबूकशी १४ लाख ५० सहस्र जण जोडलेले आहेत. याद्वारे हिंदूसंघटनाचे कार्य होते.
ई. टि्वटर : समितीच्या twitter.com/HinduJagrutiOrg या टि्वटर खात्याला हिंदूंचा वाढता प्रतिसाद लाभत असून त्याचे ४५ सहस्र ‘फॉलोवर्स’ आहेत.
४. कृतज्ञता !
धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, संत यांचे शुभाशीर्वाद, हिंदुत्वनिष्ठांचे सहकार्य अन् हिंदूंचे पाठबळ यांमुळेच समितीच्या हिंदुत्वाच्या कार्याची गेल्या १८ वर्षांपासून यशस्वी वाटचाल चालू आहे. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत. समितीच्या कार्याला आर्थिक, वस्तू, सदिच्छा स्वरूपांत, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या साहाय्य करणार्या सर्व धर्मबांधवांच्या प्रती कृतज्ञता ! समस्त हिंदु बांधवांनी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी त्यांचेही आभार ! यापुढेही समितीच्या कार्याला हिंदूंचा असाच उदंड प्रतिसाद लाभून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिकाधिक हिंदू कृतीशील व्हावेत, हीच या शुभदिनी धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती.