नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण
-
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीन-तेरा !
-
१४ जणांना अटक
पालघर जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या गोवंशियांच्या हत्या पहाता पोलिसांचा धाकच राहिला नाही, हेच दिसून येते. कसायांचा उद्दामपणा वाढतच असल्याने ‘येथील पोलीस कसायांना विकले गेलेले आहेत’, असे जनतेला वाटल्यास नवल ते काय ?
मुंबई : नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सोपारा गाव येथे पोलिसांच्या साहाय्याने गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले मानद पशूकल्याण अधिकारी श्री. राजेश पाल यांच्यावर २०० हून अधिक धर्मांधांनी जीवघेणे आक्रमण केले. या आक्रमणात श्री. राजेश पाल हे गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या वेळी नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नरसुळे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. १८ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता हा प्रकार घडला.
सध्या श्री. पाल हे अतीदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्या छातीच्या पिंजरा ‘फ्रॅक्चर’ झाला आहे. त्यांच्या गळ्यावरही मारहाण झाली आहे. अद्याप त्यांच्या जिवाचा धोका टळलेला नाही. श्री. राजेश पाल हे नालासोपारा पोलीस ठाण्यातील काही पोलिसांना घेऊन गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेले असतांना कसायांनी त्यांना मारहाण केली. कसायांनी श्री. राजेश पाल यांना उचलून अन्य ठिकाणी नेऊन जीवघेणी मारहाण केली.
पलायन केलेल्या आरोपींचा शोध घेत आहोत ! – अमोल मांडवे, पोलीस उपअधीक्षक
या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी येथील पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे यांच्याशी दूरभाषवर संपर्क केला असता ते म्हणाले की, १४ आरोपींना पकडण्यात आले आहे. पलायन केलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. राजेश पाल यांना मारहाण झाली. त्या वेळी त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते; मात्र पोलिसांना मारहाण झालेली नाही. (पोलिसांनाही न जुमानण्याइतके धर्मांध उद्दाम होणे, हे पोलीस यंत्रणेला लज्जास्पद होय ! अशा उद्दाम धर्मांधांना अल्पसंख्यांक म्हणून किती सुविधा द्यायच्या, याचा विचार सरकारने करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
‘यही है ‘राजेश पाल’, छोडो मत इसको’, असे म्हणत धर्माधांचे जीवघेणे आक्रमण
या प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात श्री. राजेश पाल यांनी म्हटले आहे की, मी आणि ३ पोलीस कर्मचारी गोवंश अन् एक वासरू यांना वाचवण्यासाठी सोपारा गावातील हड्डी तलाव येथे गेलो असतांना तेथे मोठा जमाव एकत्र आला. त्यातील शरिफ काझी याने ‘यही राजेश पाल बार-बार अपनी गाडी पकडके देता है । छोडो मत इसको’, असे म्हणत जमावाला चेतवले. या वेळी जमावाने मला मारहाण केली. पोलिसांनी मला रिक्शातून बसवून तेथून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र जमावाने रिक्शा अडवली. त्या वेळी दुचाकीवरून पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात आणले. यामध्ये जमावाने पोलिसांनाही मारहाण केली असल्याचे श्री. पाल यांनी म्हटले आहे.
आक्रमणकर्त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी १९ ऑक्टोबर या दिवशी श्री. राजेश पाल यांच्यावर आक्रमण करणार्या १४ धर्माधांना पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पालघर येथील गोवंश आणि गोमाता यांच्या हत्या का थांबत नाहीत ?
२ मासांपूर्वी ईदच्या कालावधीत वसईमध्ये श्री. राजेश पाल यांनी पोलिसांच्या साहाय्याने ४४ गोवंश आणि गोमाता यांना कसायाकडून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही त्यांच्यावर कसायांनी आक्रमण केले. राज्यात दळणवळण बंदी असून पालघर जिल्ह्यात वारंवार गोवंश आणि गोमाता यांच्या हत्येच्या घटना सातत्याने होत आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही या घटना का थांबत नाहीत ? असा प्रश्न धर्मप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात