काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी अवैधरित्या सरकारी भूमी मूर्तीसाठी दिल्याचा आरोप
बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर असणार्या कपालबेट्टा गावामध्ये जगातील सर्वांत उंच असणारी येशू ख्रिस्ताची मूर्ती लावण्यावर स्थगिती दिली आहे. या गावामध्ये ‘मूर्तीचे काम न्यायालयाच्या अनुमतीविना पुन्हा चालू करण्यात येऊ नये’, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी ते काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री असतांना या मूर्तीच्या स्थापनेसाठी १५ एकर सरकारी भूमी दिली आहे.
या याचिकेत म्हटले आहे की, येशूची मूर्ती बसवण्यासाठी अवैधरित्या जागा घेण्यात आली आहे. यासाठी २ मोठे लोक आणि त्यांचे समर्थक यांनी सरकारी संपत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कनकपुरा येथे ख्रिस्त्यांची संख्या केवळ २ सहस्र आहे. यातील दीड सहस्र ख्रिस्ती हरबोले आणि नल्लाहल्ली या गावांमध्ये रहातात. असे असतांना येथे येशूची मूर्ती बसवण्याचे औचित्य काय आहे ?, असा प्रश्नही या याचिकेत विचारण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात