धर्माभिमानी हिंदूंच्या विरोधानंतर क्षमायाचना
हिंदूंच्या देवतांचा सातत्याने होणारा अवमान आणि विरोधानंतर करण्यात येणारी क्षमायाचना पहाता संबंधितांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
नवी देहली : ‘इरॉस नाऊ’ या चित्रपट निर्मिती करणार्या आस्थापनाने नवरात्रीच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांतून काही पोस्ट प्रसारित केल्या होत्या. या पोस्टद्वारे पवित्र नवरात्रीचा अश्लाघ्य अवमान करण्यात आला होता. याचा धर्माभिमानी हिंदूंकडून विरोध करण्यात आला. ट्विटरवर ‘#BoycottErosNow’ हा हॅटटॅग ट्रेंड करून त्याद्वारा मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ‘इरॉस नाऊ’कडून क्षमायाचना करण्यात आली आहे.
भाजपचे हरियाणामधील सामाजिक माध्यम प्रमुख अरुण यादव यांनी ट्विटरकडे ‘इरॉस नाऊ’च्या विरोधात पोस्ट केल्यानंतर #BoycottErosNow हा ट्रेंड चालू झाला. अरुण यादव यांनी ट्विटरला २ छायाचित्रे ‘शेअर’ करत ‘इरॉस’कडून केला जाणारा भेदभाव दाखवला आहे. या पोस्टमध्ये एका छायाचित्रात नवरात्रीनिमित्त कामुक पद्धतीने उभी असलेली अभिनेत्री कतरिना पिवळ्या साडीत दाखवली असून दुसर्या छायाचित्रात इरॉस ईदच्या निमित्ताने सभ्य भाषेत शुभेच्छा देतांनाचे चित्र होते. यातून ईदनिमित्त शुभेच्छा देतांना इरॉसने सभ्यता पाळली; मात्र हिंदूंना असभ्य भाषेत नवरात्रीच्या शुभेच्छा देत हिंदूंच्या उत्सवाचे अश्लाघ्य भाषेत विडंबन केल्याचे स्पष्ट झाले .
पोस्टमध्ये काय होते ?
१७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ‘इरॉस नाऊ’कडून तिच्या आस्थापनाची निर्मिती असणार्या चित्रपटांतील काही छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आली. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या रंगाचे महत्त्व आहे, असे सांगत अभिनेते आणि अभिनेत्री यांची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली. त्याखाली मजकूर लिहितांना तो अश्लील लिहिण्यात आला होता.
१. अभिनेत्री कतरिना यांचे छायाचित्र कामूक होते आणि त्यात लिहिले होते, ‘डीड यू वॉन्ट टू पूट द ‘रात्री’ इन माय नवरात्री ?’
२. सलमान खान यांच्या छायाचित्रावर ‘यू नीड अ दांडी टू प्लेय दांडिया – आय हॅव वन’ असे वाक्य होते.
३. अभिनेते रणवीर सिंह यांच्या छायाचित्रावर ‘लेट्स हॅव सम मजामा, इन माय पजामा’ अशी अश्लील वाक्ये पोस्टमध्ये होती.
इरॉस नाऊची क्षमायाचना
‘इरॉस नाऊ’ने क्षमायाचना करतांना म्हटले की, आम्ही सर्व संस्कृतींवर प्रेम आणि आदर करतो. कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि नाही. आम्ही संबंधित पोस्ट डिलीट केल्या असून क्षमा मागत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात