ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आर्थिक चणचण निर्माण झाल्यामुळे ते पदाचे त्यागपत्र देण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती ब्रिटीश वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. एखाद्या देशाचा प्रमुख आर्थिक कारणांसाठी पदत्याग करणार असल्याची ही बहुदा पहिलीच वेळ असेल. भारतियांसाठी तर ही आश्चर्याची गोष्ट आहे; कारण ‘राजकारण्यांना अशी समस्या भेडसावू शकते ?’, हेच मुळात भारतात पचनी पडणे थोडे कठीण आहे. भारतात राजकारण हे कलंकित क्षेत्र झाले आहे. ‘जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो’, असे केवळ बोलले जाते; मात्र राजकारण करून केवळ स्वतःचे कोटकल्याण केले जाते, अशीच उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. याला छेद देणारी काही उदाहरणे असतीलही; मात्र तीही विरळच. एका साध्या घरात रहाणारी व्यक्ती राजकारणात जाऊन बंगल्यात किंवा ऐषारामात राहू लागली, अशी अनेक उदाहरणे आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्याचा अभ्यास केल्यास अनेक आमदार-खासदारांची संपत्ती ही काही वर्षांत अनेक पटींनी वाढल्याचे समोर येते. ‘कमाईचा कोणताही आर्थिक स्रोत नसतांनाही हे कसे होते ?’, हे काही आता कोडे राहिलेले नाही. ही भ्रष्टाचाराची कमाई आहे. राजकारण आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेच भारतात पहायला मिळते. असे असले, तरी बोरिस जॉन्सन यांच्या या निर्णयावरून एक वेगळा पैलू आपल्यासमोर आला.
बोरिस जॉन्सन यांना वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४३ लाख रुपये इतके वेतन मिळते. ‘पंतप्रधान पदावरून दूर झाल्यास वृत्तपत्रात स्तंभलेखन करून यापेक्षा दुप्पट रक्कम मिळवू’, असा जॉन्सन यांचा विचार आहे. यावरून ‘राजकारण करणार्याने स्वतः आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न व्हावे’, ही इच्छा बाळगणे चुकीचे आहे का ? किंवा ‘त्यासाठी राजकारणाचा त्याग करणे चुकीचे ते का ?’, असेही प्रश्न उपस्थित झाले. स्वतःचा ऐहिक उत्कर्ष साधणे, यात चुकीचे काहीच नाही; मात्र या मार्गावरून चालण्यासाठी राजकारण हा मार्ग असू शकतो का ? भारतात पूर्वी धर्माधिष्ठित राजकारण केले जायचे. राजकारण किंवा राज्यकारभारात सहभागी असलेली व्यक्ती ही स्वतःच्या ऐहिक सुखासाठी नव्हे, तर जनतेच्या सुखासाठी झटण्यासाठीच राज्यकारभार करत असे. हिंदु धर्मात राजाला श्रीविष्णूचे स्वरूप समजले जाते. श्रीविष्णु हा प्रजेचा पालनकर्ता आहे. त्यामुळे राजाने प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपणे, त्याचे भरण-पोषण करणे, हेच त्याचे कर्तव्य असते. त्याच्यासाठी स्वतःचे वैयक्तिक आयुष्य, स्वतःचे सुख असे काहीच नसते. यावरून ‘राजकारणाद्वारे समाजकारण करणे किती कठीण आहे’, हे आपल्या लक्षात येते. जनहितासाठी स्वतःचे आयुष्य पूर्णपणे समर्पित करणे, हे तितकेसे सोपे नाही. धर्माधिष्ठित राज्यकारभार करणारे अनेक राजे आपल्याकडे होऊन गेले; मात्र राजकारणात वावरूनही त्यागी आणि निःस्पृह जीवन जगणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासारखी फार अल्प उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. बोरिस जॉन्सन यांच्या निर्णयावरून धर्माधिष्ठित राजकारणी समाजाला मिळण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात