रणरागिणी शाखेच्या ११ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने…
हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा असणार्या ‘रणरागिणी’चा आज निज आश्विन शुक्ल पक्ष अष्टमीला (२४.१०.२०२०) ११ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त रणरागिणी शाखेने केलेल्या राष्ट्र-धर्मकार्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.
संकलक : कु. प्रतीक्षा कोरगावकर, समन्वयक, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती
स्त्रीमूलं शक्तिः पुरुषस्य मूलं बलम् ।
स्त्रीसङ्घटनकरणेन लाभो (भविष्यति) विजयाय ॥
अर्थ : स्त्रीचे मूळ शक्तीत, तर पुरुषाचे मूळ बळात आहे. स्त्रीसंघटनाचे कार्य केल्याने त्याचा विजयासाठी (हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी) लाभ होणार आहे.
१. मंदिरातील प्रथा-परंपरांचे रक्षण करण्यासाठी घेतलेला पुढाकार !
देशभरातील अनेक मंदिरांमध्येही धर्मशास्त्राने घालून दिलेले, तसेच पूर्वापार चालत आलेले मंदिरप्रवेशाच्या संदर्भातील नियम आहेत, त्या पाळण्यातच सर्वांचे हित असते; मात्र तथाकथित पुरोगामींनी स्त्रीमुक्तीचा ढोल बडवत या परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. अशांच्या वैचारिक आतंकवादाला हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणींनी ठामपणे विविध माध्यमांद्वारे प्रत्युत्तर दिले. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण, देवतांची कृपा आणि संतांचे आशीर्वाद यांमुळेच रणरागिणीच्या वतीने करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
१ अ. शनिशिंगणापूर येथे धर्मरक्षणासाठी रणरागिणींनी दिलेला लढा ! : ‘२६ जानेवारी २०१६ या दिवशी धर्मद्रोही भूमाता ब्रिगेड या संघटनेने शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर चढण्याचा घाट घातला होता. त्याला स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रणरागिणी यांनी तीव्र विरोध करून आंदोलन उभारले; मात्र स्त्रियांवरील अन्याय दाखवून देण्यासाठी जनतेची दिशाभूल करणारी चर्चासत्रे विविध वृत्तवाहिन्यांनी घेतली. निवेदकांनी तथाकथित स्त्रीवादी, पुरोगामी, विद्रोही यांची बाजू घेत ‘रूढी-परंपरा यांचा त्याग करायला हवा’, असे सांगितले; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या आणि सनातनच्या साधिका यांनी धर्माची बाजू परखडपणे मांडून धर्मशास्त्र समाजापर्यंत पोचवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. हिंदु जनजागृती समिती सर्व उपक्रम वैध मार्गाने राबवते. त्यामुळे शनिशिंगणापूर येथेही वैध मार्गानेच हिंदु धार्मिक प्रथा-परंपरा रक्षण चळवळ राबवण्यात आली. पत्रकार परिषदा, प्रबोधन बैठका, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून केलेला प्रसार अशा प्रकारे रणरागिणींसह हिंदुत्वनिष्ठ महिलांनीही धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा वणवा पेटवला. धार्मिक प्रथा मोडू पहाणार्या ४०० महिलांच्या विरोधात २ सहस्र धर्मनिष्ठ महिला उभ्या ठाकल्या. धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी संघटित होऊन रणरागिणींनी भूमाता ब्रिगेडवाल्यांच्या धर्मद्रोही प्रयत्नांना वैध मार्गाने लढा दिला.
१ आ. त्र्यंबकेश्वर येथे संघटित झालेल्या रणरागिणींनी धर्मद्रोही प्रयत्न हाणून पाडला ! : ७ मार्च २०१६ या महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची चेतावणी भूमाता बिग्रेडी महिलांनी दिली होती. ‘हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्या महिलांना रोखतील’, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. त्र्यंबकेश्वर गावात रहाणार्या १ सहस्र २०० स्थानिक महिलांनीही मंदिरातील प्रथा मोडू नये; म्हणून स्थानिक प्रशासनाला स्वाक्षर्यांचे निवेदन दिले होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधाचा परिणाम म्हणून आंदोलन करणार्या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला सहकारी यांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले. रणरागिणींच्या संघटितपणामुळे भूमाता ब्रिगेडचा हाही प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
१ इ. शबरीमला (केरळ) देवस्थान : सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला (केरळ) मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात केरळ येथील महिला आणि धर्माभिमानी नागरिक यांनी लढा उभारला होता. त्यात रणरागिणी शाखेनेही विविध माध्यमांतून या निर्णयाला विरोध दर्शवला.
१ ई. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्याच्या तृप्ती देसाई यांच्या धर्मविरोधी कृतीस रणरागिणी शाखेच्या वतीने वैध मार्गाने विरोध ! : ‘पुरुषांना गर्भगृहात प्रवेश आहे, तर महिलांनाही तो हवा’, असे कारण पुढे करून भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्वर, शनीशिंगणापूर याप्रमाणे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील गर्भगृहात घुसण्याचा प्रयत्न केला. तेथे रणरागिणी शाखेच्या वतीने वैध मार्गाने आंदोलन करून विरोध करण्यात आला. या कालावधीत विविध दूरचित्रवाहिन्यांवर झालेल्या चर्चासत्रांमध्ये रणरागिणी शाखेच्या महिला कार्यकर्त्यांनी महिलांना गर्भगृहात प्रवेश नसण्याविषयीची धर्मशास्त्रीय भूमिका ठामपणे मांडली. या निमित्ताने रणरागिणी शाखेने समाजातील विविध महिलांचे संघटनही केले.
२. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन
सध्या महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि युवती यांना स्वरक्षण करता यावे, यासाठी रणरागिणीच्या वतीने कराटे, लाठी चालवणे आदी प्रकार शिकवणारे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग विनामूल्य घेण्यात येतात. ‘स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर ठिकठिकाणी मार्गदर्शनांचे आयोजन केले जाते. प्रात्यक्षिके दाखवली जातात.
३. हिंदु धर्मावरील मोठे संकट : ‘लव्ह जिहाद’
‘लव्ह जिहाद’ म्हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदू अन् ख्रिस्ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध ! हिंदु स्त्रिया ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नयेत, यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला नामोहरम करून हिंदु मुलींचा मौल्यवान ठेवा जपण्यासाठी रणरागिणीच्या वतीने प्रयत्न केले जातात. रणरागिणीच्या महिलांकडून ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या किंवा बळी पडलेल्या तरुणींचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला जातो.
‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, व्यावसायिक केंद्रे, धार्मिक कार्यक्रम आदी माध्यमांतून जागृती केली जाते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित केलेला ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंंथ घेण्यासाठीही आवाहन केले जाते. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याने त्याविषयी लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांना संघटितपणे निवेदने देण्यातही रणरागिणींचा पुढाकार असतो.
हे रणरागिणी, जगदंबा तुला बनायचे आहे ।
दुष्प्रवृत्तींना धडा तुला शिकवायचा आहे ।
देवींचा आशीर्वाद आहे, ऋण देवींचे फेडायचे आहे ।
उठ रणरागिणी, आता तुला लढायचे आहे, उठ रणरागिणी आता तुला लढायचे आहे ॥
प्रार्थना
हे रणरागिणी, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार्या आणि शिवबासारख्या क्षात्रवीराला घडवणार्या माता जिजाऊंचा आदर्श घे. यवनांना न डगमगता प्राण असेपर्यंत लढणार्या राणी लक्ष्मीबाईचा तू आदर्श घे. स्वतः संकटे झेलून हे महान हिंदु राष्ट्र स्थापण्याचे कार्य करणार्या राणी चन्नम्माचाही आदर्श घे. तू शांत बसू नकोस. या राष्ट्राच्या स्थितीची जाणीव अंतःकरणात धगधगत ठेव. हे नारी, संकल्प कर राष्ट्र आणि धर्म यांना अत्याचारांपासून मुक्त करण्यासाठी, भारतमातेला एक सुटकेचा श्वास घेता येण्यासाठी कटीबद्ध हो !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात