हिंदु महासभेच्या वतीने आयोजित नवरात्री नारीशक्ती व्याख्यानमाला
सोलापूर : हिंदूंचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. हिंदु पुरुष शूरवीर आहेतच; परंतु हिंदूंच्या स्त्रियाही शूरवीर होत्या. हिंदु स्त्रियांमध्ये जन्मत:च दुर्गादेवीचा अंश आहे याची प्रचिती हिंदूंच्या इतिहासात आहे. आज प्रत्येक १६ मिनिटानंतर १ बलात्कार होत आहे. त्यामुळे आता हिंदु स्त्रियांमधील दुर्गादेवीचे तत्त्व जागृत करण्यासाठी, तसेच त्यांना निर्भय बनवण्यासाठी साधनेविना पर्याय नाही.
प्रत्येक हिंदू स्त्रीने साधना केल्यास वातावरणातील दुर्गादेवीची शक्ती तिच्या माध्यमातून कार्यरत होते आणि ती निर्भयपणे कोणत्याही संकटाचा सामना करू शकते. त्यासाठी नवरात्रीच्या कालावधीत शक्तीचा जागर करून श्री दुर्गादेव्यै नमः, असा नामजप अधिकाधिक करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. पंढरपूर हिंदु महासभेच्या वतीने आयोजित क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ फेसबूक लाईव्हद्वारे नवरात्री नारीशक्ती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या हिंदु स्त्रियांचा गौरवशाली इतिहास या विषयावर बोलत होत्या.
सौ. तिवारी पुढे म्हणाल्या की, ज्या ज्या वेळी धर्मावर आघात झाले आहेत त्या त्या वेळी श्री दुर्गादेवीने कधी महिषासुरमर्दिनी, कोल्हासूर मर्दिनी, शाकंबरीदेवी, चामुंडा, काली अशा विविध रूपांमध्ये अवतार घेऊन असुरांचा नाश केला आहे, तर अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांनी हिंदु स्त्रिया कशा निर्भय आणि शूर होत्या याचा इतिहास आपल्या समोर ठेवला आहे.