हिंदूंबहुल भारतात हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या वेब सिरीजच्या निर्मार्त्यांवर कारवाई का करत नाही ? तसेच अशा वेब सिरीजवर बंदी का घालत नाही ?
मुंबई : ‘एम् मॅक्स प्लेयर’ या ‘ओटीटी अॅप’वर आगामी प्रसारित होणार्या ‘आश्रम’ या वेब सिरीजच्या दुसर्या भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका असल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. ३ मासांपूर्वीही या मालिकेच्या पहिल्या सत्रालाही विरोध झाला होता. आता धार्मिक संघर्ष, भावना आणि तेढ निर्माण करणारे या वेब सिरीजचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांना अटक करण्यासाठी ट्विटरवरून ‘#Arrest_Prakash_Jha’ या हॅशटॅगद्वारे ट्रेंड करण्यात आला. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ४ थ्या क्रमांकावर होता. त्यावर ३० सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी ट्वीट्स करत या वेब सिरीजचा विरोध केला.
या मालिकेतून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी जोधपूर येथील एका पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या वेब सिरिजमधून भोंदू बाबाविषयी दाखवतांना हिंदूंच्या परंपरांचा अवमान करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबरपाहून ही वेब सिरीज चालू होणार आहे. यापूर्वी २८ ऑगस्टला या मालिकेच्या पहिल्या सत्राचे ९ भाग नि:शुल्क प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये अभिनेता बॉबी देओल यांनी ‘बाबा निराला काशीपुरवाला’ नावाच्या एका भोंदूबाबाची भूमिका वठवली आहे. त्यात बाबा निराला याचा गुंड ते ईश्वरभक्त बनण्याचा प्रवास दाखवला आहे. त्याचे सहस्रो भक्त असून तो रुग्णालय, शाळा, महाविद्यालय यांसह एक आश्रम चालवत आहे. या आश्रमामध्ये तो बलात्कार, हत्या, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आदी गुन्हेही करतांना दाखवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात