फ्रान्स हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच कणखर आणि राष्ट्रहितकारक भूमिका घेण्यात आघाडीवर असतो. याचा प्रत्यय फ्रान्सच्या एका उदाहरणातून पुन्हा एकदा आला आहे. फ्रान्समध्ये मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे अनेक इस्लामी देशांमधून ‘#BoycottFrenchProducts’, असा हॅशटॅग ट्रेंड करण्यात येत आहे. परिणामस्वरूप सध्या फ्रान्सच्या उत्पादनांची इस्लामी देशांमध्ये विक्रीच होत नाही. असे असले, तरी फ्रेंच नागरिक ‘#WeSupportFrance’ या व्टिटर ट्रेंडद्वारे फ्रान्स सरकारला समर्थन देत आहेत.
इमॅन्युअल मॅक्रॉन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी वाढत्या इस्लामी कट्टरतावादाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्लाम संकटात आहे’, असे उपहासात्मक विधान केले होते. या घटनेनंतर फ्रान्समधील शिक्षकाने ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकामधील महंमद पैगंबर यांची प्रसिद्ध केलेली व्यंगचित्रे वर्गात दाखवल्यावरून धर्मांधाने त्यांचा शिरच्छेद केल्यानंतर पॅरिसमधील मशीद बंद करण्यासाठी इस्लामी संघटनांवर करण्यात येणार्या कारवाईमुळे या इस्लामी कट्टरतावाद्यांना पोटशूळ उठला आणि शेवटी त्यांनी फ्रान्समधील उत्पादनांवर बहिष्काराचा मार्ग अवलंबला. इस्लामी राष्ट्रांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर यथेच्छ टीका करून तोंडसुख घेतले. मोठ्या प्रमाणात झालेली टीका आणि देशातील उत्पादनांच्या विक्रीवर होणारा परिणाम पाहूनही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ‘आम्ही कधीही पराभव स्वीकारणार नाही’, असे अतिशय बाणेदारपणाचे उत्तर दिले. यातून खरंच भारताने शिकण्यासारखे आहे. हानी सोसावी लागूनही गर्भगळीत न होता, तसेच नरमाईची नव्हे, तर राष्ट्रहितैषी भूमिका, तसेच धाडसी निर्णय घेणार्या राष्ट्राध्यक्षांकडून भारताने बोध घ्यायला हवा. अन्य राष्ट्रांनी आपल्या देशातील उत्पादनांवर बहिष्कार घातला, तरी त्याला न जुमानता राष्ट्राच्या संरक्षणार्थ निर्णय घेणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रमुखाचे प्रथम कर्तव्य असते. ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पार पाडले आहे. यावरून ‘फ्रान्स जगाला अन्यायाच्या विरोधात क्रांती करायला शिकवत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आज करत आहेत, ते भारतातही व्हायला हवे; कारण संपूर्ण जगभरात इस्लामी आतंकवादाची झळ सर्वाधिक भारतानेच सोसलेली आहे. केवळ इतकेच नव्हे, तर आतंकवादरूपी विषवृक्षाची फळेही आज भारतियांना चाखावी लागत आहेत. ही सद्य:स्थिती पहाता मानवतेच्या शत्रूच्या विरोधात फ्रान्सने घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे. याच अनुषंगाने ‘#welldonefrance’ हा ट्विटर ट्रेंड राबवण्यात आला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात हा ट्रेंड प्रथम क्रमांकावर होता. भारतियांनी फ्रान्सची राष्ट्रप्रेमी बाजू उचलून धरली. हेही नसे थोडके; परंतु केवळ सामाजिक माध्यमांवर समर्थन दिले, म्हणजे झाले, इतक्यावरच अल्पसंतुष्ट न होता भारतियांनी आता इस्लामी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी नव्या पिढीला, युवकांना प्रशिक्षण द्यायला हवे. असे युवकच आपत्कालीन स्थितीत स्वातंत्र्यसेनानींप्रमाणे देशाच्या कामी येतील.
इस्लामी आतंकवादाची आग विझवा !
इस्लामी आतंकवादाचा भस्मासुर आज विविध मार्गांनी जग पोखरून काढत आहे. त्याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यायलाच हवे. हा आतंकवाद धर्मांधतेतून निर्माण झाला आहे. इस्लामी कट्टरतावादाने भारताचे अनेक तुकडे पाडले. पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची विषारी फळे आहेत. त्यामुळे आतातरी तो संपवायलाच हवा. हा आतंकवाद म्हणजे संपूर्ण मानवजातीचाच शत्रू आहे. ‘भले तरी देऊ नेसोची लंगोटी, नाठाळांचे माथां हाणू काठी ।’ ही संत तुकाराम महाराजांची उक्ती आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, ‘जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगते, त्या राष्ट्राचा भविष्यकाळ अंधःकारमय असतो.’ त्यामुळे भूतकाळ विसरून नव्हे, तर भूतकाळातील उदाहरणांतून धडा घ्यायला हवा. राष्ट्रीय सलोखा बिघडवणारी आणि भडकलेली ही आतंकवादरूपी आग विझवण्याची वेळ आता आली आहे. इस्लामी आतंकवादाची पाळेमुळे खणून काढायला हवीत. देशाची राष्ट्रीय अखंडता आणि एकात्मता जपली जाईल, याची काळजी घेणे, हे प्रत्येक भारतियाचे दायित्व आहे.
इस्लामी आतंकवाद आणि भारत !
आंतरराष्ट्रीय वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी आतंकवादाला खतपाणी घातले. त्यातूनच तो फोफावत गेला. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामच्या विरोधात विधान केल्यावर अनेक इस्लामी राष्ट्रे एकवटली; कारण इस्लाम असो किंवा महंमद पैगंबर असो, त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड करण्यास ते कदापि सिद्ध नसतात. खेदजनक स्थिती आहे, ती हिंदूंची ! हिंदूंवर अत्याचार झाले किंवा हिंदू, तसेच हिंदु धर्म यांची अवहेलना झाली, तर भारतातील एकतरी सरकार त्याचा विरोध करते का ? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. काही ठराविक कर्महिंदू सोडले, तर भारतातच हिंदु धर्माविषयी कुणाला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताला भेडसावणार्या इस्लामी आतंकवादाच्या प्रश्नावर कुणीही भारताचे समर्थन करत नाही. त्यातल्या त्यात फ्रान्स देश आतंकवादाच्या प्रश्नावर भारताच्या बाजूने आहे. मागील वर्षी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ‘काश्मीरच्या प्रश्नावर कोणत्याही तिसर्या देशाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. काश्मीर प्रश्न हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सूत्र आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चर्चेतूनच यावर तोडगा निघू शकतो’, असे विधान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी करून अमेरिकेला टोला लगावला होता. भारताच्या दृष्टीने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेली ही भूमिका निश्चितच लक्षणीय होती. फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. तसे झाल्यासच ‘मित्र असणार्या फ्रान्सच्या उदाहरणातून भारताने आदर्श घेतला’, असे म्हणता येईल. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली आहे, हे भारताने लक्षात ठेवावे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात