हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर वृत्तपत्राकडून जाहीर क्षमायाचना
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथील सीमोल्लंघनाचे वार्तांकन करतांना येथील ‘दैनिक दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबर या दिवशी बातमीच्या मथळ्यामध्ये ‘कुंकवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा चालू; आता ५ दिवसांसाठी क्वारंटाईन’, असा उल्लेख करून देवीचा अवमान केला होता. या प्रकरणी अनेक हिंदूंनी वृत्तपत्राच्या संपादकांना दूरभाष करून निषेध व्यक्त केला, तसेच सामाजिक माध्यमांद्वारेही विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या दैनिकाचा जोरदार निषेध केला. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर २८ ऑक्टोबर या दिवशी दैनिकातून समस्त भाविकांची क्षमायाचना केली.
येथे २६ ऑक्टोबरच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर श्री तुळजाभवानीदेवी ५ दिवस श्रमनिद्रा घेते. त्यानंतर आश्विन पौर्णिमेच्या पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होते.
दैनिक ‘दिव्य मराठी’ने क्षमायाचना करतांना म्हटले आहे की, २७ ऑक्टोबरच्या अंकात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या बातमीतील शीर्षकामध्ये ‘क्वारंटाईन’ असा शब्दप्रयोग झाला आहे. तो अयोग्य आहे. यातून भाविकांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता; मात्र झालेल्या चुकीविषयी आम्ही समस्त भाविकांची, तसेच देवीशी संबंधित पुजार्यांची क्षमा मागत आहोत आणि दिलगिरी व्यक्त करत आहोत.
यापुढे हिंदू आपल्या देवतांचा अवमान सहन करणार नाहीत ! – महंत मावजीनाथ महाराज, दशावतार मठ, तुळजापूर
‘दिव्य मराठी’ दैनिकाने केलेल्या देवीच्या विटंबनेविषयी आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्यांनी वृत्तपत्रात जाहीर क्षमायाचना प्रसिद्ध केली असली, तरी यापुढे हिंदू आपल्या देवतांचा अवमान सहन करणार नाहीत, हे लक्षात घ्यावे.
प्रतिक्रिया
१. यापुढे हिंदु धर्म आणि देवता यांविषयी अयोग्य लिखाण केल्यास चुकीला क्षमा नाही ! – अजय साळुंके, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तुळजापूर
दैनिक ‘दिव्य मराठी’ने क्षमायाचना करून विषय संपला असे नाही, तर यापुढे हिंदु धर्म आणि देवता यांविषयी अयोग्य लिखाण केल्यास चुकीला क्षमा नाही.
२. विटंबनात्मक वृत्तासाठी उत्तरदायी असणार्यांवर लवकर कारवाई व्हावी ! – शशिकांत कदम, देवीचे भोपे पुजारी, तुळजापूर
‘दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात जगदंबेच्या धार्मिक विधीची विटंबना करून भाविकांच्या भावना दुखावल्या, त्याविषयी त्यांनी क्षमायाचना केली आहे. कृपया असे आपल्याकडून पुन्हा कधीही होणार नाही, अशी अपेक्षा करतो, तसेच या वृत्तासाठी उत्तरदायी असणार्यांवर लवकर कारवाई व्हावी.
३. १३०० वर्षांपासूनच्या धार्मिक विधीची विटंबना केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत ! – जितू भगत, देवीच्या पलंग पालखीचे मानकरी
मागील १३०० वर्षांपासून प्रतिवर्षी आम्ही पलंग आणि पालखी सीमोल्लंघनासाठी नगर येथून घेऊन येतो. आमच्या पलंगावर देवीला प्रतिवर्षी झोपवण्यात येते. या १३०० वर्षांपासूनच्या चालत आलेल्या धार्मिक विधीची विटंबना केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ने क्षमा मागितली असली, तरी या वार्तांकनासाठी उत्तरदायी असणार्यांवर योग्य ती कारवाई व्हावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात