पणजी : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे; मात्र कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढू नये, यासाठी विद्यमान स्थितीतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे आणि शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांना चांगले आरोग्य लाभावे आणि आरोग्यविषयक प्रश्न सुटावा, यासाठी कृतीशील असलेल्या आरोग्य साहाय्य समितीने या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत.
१. राज्यात काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण समाजात मोकळे फिरतांना दिसत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. घरी अलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण सर्व शासकीय नियमांचे पालन करत आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्याची यंत्रणा शासनाने सिद्ध करणे आवश्यक आहे.
२. शासनाने काही खासगी रुग्णालयांना चाचण्या करण्यासाठी संमती दिली आहे; मात्र ही संख्या अपुरी असल्याने अधिकाधिक रुग्णालयांत कोरोना चाचणी करता येईल, यासाठी व्यवस्था करावी.
३. कोरोनासंबंधी चाचणी करण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालये यांमधील दरांमध्ये मोठ्या प्रमाणात भेद आहे. शासनाने खासगी रुग्णालयांत होणार्या कोरोना चाचणीच्या शुल्कावर अंकुश ठेवावा.
४. कोरोनाबाधित रुग्णांचा चाचणी अहवाल देतांना त्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे अल्प, मध्यम कि तीव्र स्वरूपाची आहेत, याविषयीची माहिती चाचणी अहवालात स्पष्टपणे द्यावी.
५. प्रत्येक रुग्णालयाने रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या रिकाम्या खाटांविषयीची माहिती ‘ऑनलाईन’ उपलब्ध करावी. यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका अल्प होऊन त्याला थेट खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात नेणे शक्य होईल.
६. रुग्णालयांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रिकाम्या खाटांविषयीची माहिती शासकीय संकेतस्थळावरही उपलब्ध करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात