कोणत्याही भ्रमात न रहाता प्रत्येकाने स्वत:चे कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सक्षम व्हावे ! – अभिजित भोजणे, युवा संघटक
मुंबई : कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि दैनंदिन अडचणी यांतच आपण व्यस्त असतो. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘आपण सुरक्षित आहोत’, या भ्रमात आपण रहातो. याच मानसिकतेमुळे ३० वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंंवर ओढवलेली परिस्थिती आज देशातील अनेक ठिकाणच्या हिंदूंवर ओढवली आहे. त्यामुळे कोणत्याही भ्रमात न रहाता प्रत्येकाने स्वत:चे कुुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतर्क अन् सक्षम होणे काळाची आवश्यकता आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. अभिजित भोजणे यांनी केले.
समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणाच्या उपक्रमाच्या अंतर्गत भांडुप आणि मुलुंड येथील धर्मप्रेमी युवक-युवती यांसाठी २४ ऑक्टोबर या दिवशी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी समितीच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीपर विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
या वेळी मार्गदर्शन करतांना अभिजित भोजणे म्हणाले, ‘‘सध्यस्थितीला समाजातील दुष्प्रवृत्ती, महिलांवरील बलात्कार, हिंदु धर्मावरील आघात यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यासह वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता शारीरिक बळासह मानसिक बळ असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच स्वरक्षणासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणेही आवश्यक आहे.’’