Menu Close

रझा अकादमीची कुकृत्ये !

सुन्नी साहित्याचा प्रसार करत आतून आतंकवाद पोसणार्‍या रझा अकादमी या मुसलमानांच्या संघटनेने इस्लामच्या पवित्र प्रेषितांचा अवमान केल्याविषयी २९ ऑक्टोबर या दिवशी मुंबईत फ्रान्सच्या विरोधात निदर्शने केली. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ‘इस्लाम धर्म हा जागतिक संकट आहे’, असे वक्तव्य केले होते, त्याविरोधात त्यांचा रोष आहे. त्यामुळे भेंडी बाजारात या संघटनेने मॅक्रॉन यांची छायाचित्रे रस्त्यावर चिकटवली. तसेच दक्षिण मुंबईत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. आतंकवाद्यांनी फ्रान्समध्ये सामान्य शिक्षकाचा शिरच्छेद करण्याच्या दुष्कृत्यानंतर ‘फ्रान्सने चालू केलेल्या आतंकवादाच्या विरोधातील कारवाईमुळेच रझा अकादमीसारख्या संघटनांना आंदोलने करण्याचे ‘आदेश’ मिळाले आहेत’, असे कुणाला वाटले तर चूक नव्हे. अन्यथा ‘भारत शासन आतंकवादाच्या विरोधातील लढाईत फ्रान्सला पाठिंबा देत असतांना अशा प्रकारे फ्रान्सविरोधात भारतात आंदोलने करणे, यातून या आतंकवादी संघटनेला अनेक हेतू साध्य करायचे आहेत’, हे न कळण्याइतके कुणी दूधखुळे नाही.

आंदोलन कशासाठी ?

मुंबईत नियोजनपूर्वक दंगली करणार्‍या या संघटनेचे कुठलेच हेतू शुद्ध असू शकत नाहीत. रझा अकादमीच्या मुंबईतील आंदोलनाचे लोण उद्या देशभर पसरले तर ? कि तेच यांना अपेक्षित आहे ? अशी आंदोलने वाढली आणि त्या कालावधीत काही वेगळी संवेदनशील स्थिती निर्माण झाली, तर त्याचे दायित्व कोण घेणार ? जगाच्या पाठीवरील घटनांचे निमित्त करून धर्मांधांनी एकत्र येऊन ‘इस्लाम खतरेमें है’च्या घोषणा देणे, हे गेली कित्येक वर्षे भारतात चालू आहे. मग ते कुराणाचे पान जाळल्याचे निमित्त असो किंवा प्रेषित यांच्या व्यंगचित्राचे ! एकीकडे ‘आमच्यापुढे अनेक प्रश्‍न आहेत’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे सतत ‘धर्माच्या नावावर विनाकारण विवाद वाढवत रहायचे’, ही अल्पसंख्यांकांची वृत्ती आहे. अशा प्रकारची आंदोलने करून ही संघटना कुणाशी मैत्री दाखवत आहे आणि कुणाला विरोध करत आहे ? ‘श्रद्धास्थानांचा अवमान केला जाऊ नये’, याविषयी कुणाचे दुमत असणार नाही; परंतु त्यासाठी कुणी सामान्य जनतेचे शिरच्छेद करत सुटत नाही किंवा कायदा हातात घेत नाही. त्यामुळे त्याचे समर्थन करू शकत नाही.

रझा अकादमीचा इतिहास

वर्ष २०१२ मध्ये मुंबई दंगलीनंतर सर्वांनी रझा अकादमीला लक्ष्य केल्यावर नाईलाजाने त्यांनी पुष्कळ उशिराने क्षमा मागितली; परंतु दंग्यांचे दायित्व घेण्यास नकार दिला. ‘दंगलीला उत्तरदायी अन्य लोक मोर्च्यात आले होते’, असे त्यांनी या वेळी सांगितले. या मोर्च्याचे दायित्व त्यांनीच घेणे अपेक्षित होते; पण असे केले, तर ते अल्पसंख्यांक कसले ? या दंगलीच्या वेळी महिला पोलिसांचे कपडे फाडले गेले. त्या वेळी ‘दंगलखोर मागून येत असतांना पोलीस जीव मुठीत धरून पळत असल्याची’ प्रसिद्ध झालेली छायाचित्रे कुणीही विसरू शकत नाही. पोलिसांसाठी हे एक आव्हानच होते. माध्यमांच्या ‘ओबी व्हॅन’ यांनी जाळल्या. इतकेच काय क्रांतीकारकांच्या सन्मानार्थ उभ्या केलेल्या अमर ज्योतीला लाथा मारल्या. पोलीस, माध्यमे, देशाच्या सन्मानाची प्रतिके यांचा अवमान ज्यांच्या कार्यकर्त्यांना करायचा आहे, त्यांचे मनसुबे काय असू शकतात, हे कुणीही सांगू शकते. हे देशाचे शत्रू नव्हेत काय ? यांना पोसणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे नव्हे काय ? पोलिसांना म्हणजे देशातील प्रशासनाला वेठीस धरणार्‍या या आतंकवादी संघटनेची पाळेमुळे शोधणे आवश्यक नव्हे काय ?

हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा

रझा अकादमीने मुंबईत केलेल्या दंगलीत जी प्रचंड हानी झाली, त्याची हानीभरपाई द्यावी म्हणून रझा अकादमीला नोटीस पाठवण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या लढ्यामुळे तत्कालीन शासनाला भाग पडले. त्या वेळी पत्रकारांनीही हा विषय उचलून धरला. माध्यमांची हानी होऊनही माध्यमांनी स्वतःहून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलले नव्हते.

आतंकवादाची पाळेमुळे उखडा

३० ऑक्टोबरलाही काश्मीरमध्ये भाजपच्या ३ नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. पाकिस्तान दिवसेंदिवस दुबळा होत असूनही पाकपुरस्कृत आतंकवाद अल्प होत नाही. देहलीमधील दंगलीच्या आठवणी अजून ताज्या आहेत. जगभर आतंकवादी आक्रमणे वाढतच आहेत. रशियातही ३० ऑक्टोबरला ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत एका तरुणाने पोलिसावर चाकूने आक्रमण केले. ‘वेदनादायक शिक्षा मिळेल’, अशी धमकीच भारतातून पलायन केलेला हिंदुद्वेष्टा झाकीर नाईक याने उघडपणे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना दिली आहे. हे आतंकवाद्यांचे धैर्य आहे. कुठेतरी चाप लावल्याखेरीज आतंकवाद्यांचा उद्दामपणा अल्प होणार नाही. रझा अकादमी ज्या त्वेषाने माध्यमांना जमवून आंदोलन करत आहे, त्यातून श्रद्धास्थानाच्या अवमानाची चीड अल्प आणि आतंकवादी प्रवृत्तीला खतपाणी घालणे अधिक आहे. त्यांच्या घोषणांमध्ये स्वतःच्या संघटनेच्या घोषणांचीही भर आहे. ज्या मलेशियात झाकीर नाईक आहे, त्यांच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीही ‘मुसलमानांना रागावण्याचा आणि फ्रेंच लोकांना मारण्याचा अधिकार आहे’, असे म्हटले आहे. हे आतंकवादाचे उघड समर्थन आहे. अनेक आतंकवादी झाकीर नाईक याचे अनुयायी असल्याचे पुढे आले आहे. त्याचे आणि माजी पंतप्रधान आव्हान जिहादला प्रोत्साहन देणारे आहे, तसेच रझा अकादमीचे आंदोलनही मुसलमानांना भडकावणारे आहे. रझा अकादमी या संघटनेने अन्य काही विपरीत कृत्ये करण्यापूर्वी आणि त्याचे परिणाम पुढे होण्यापूर्वीच त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. रझा अकादमीचा इतिहास दंगलखोरीचा आहे. येणार्‍या आपत्काळात देशाच्या सीमाभागात सैन्य गुंतलेले रहाणार आहे. त्या वेळी मुंबईसारख्या देशाच्या कोणत्याही शहरात दंगलसदृश स्थिती उद्भवली, तर पोलिसांची कुमकही अल्प पडू शकते. येणारा काळ युद्धाचा आहे. या दृष्टीने पूर्वनियोजन म्हणून आतंकवादी संघटनांच्या प्रक्षोभक आंदोलनांवर बंदी घालणेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य रहाणार आहे. कारण ‘त्यांच्या आंदोलनाचे रूपांतर दंगलीत होते’, असा अनुभव आहे. त्यामुळे आतंकवाद पोसणार्‍या संघटनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणेच हितावह ठरेल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *