‘वर्ष १९७२-७३ मध्ये पुण्यामध्ये एक मोठे हत्याकांड झाले. यात आक्रमणकर्त्यांनी जोशी आणि अभ्यंकर यांच्या कुटुंबातील ८ जण आणि २ नोकर मिळून १० व्यक्तींची हत्या केली. या प्रकरणाचा छडा लावणे अन्वेषण यंत्रणांंसाठी मोठे आव्हान होते; कारण आरोपी हे आधी व्यक्तींना गुंगीत ठेवायचे आणि नंतर त्यांची हत्या करायचे. यावर पुरोगामी आणि नाट्य अभिनेते यांनी आरोपींना ‘वाट चुकलेले तरुण’ म्हटले. त्यानंतर काही दिवसांनी मराठवाड्यातील ढोकी गावामध्ये २ मागासवर्गीय तरुणांचे हत्याकांड झाले. तेव्हा हेच कलाकार म्हणाले की, ‘हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे !’ अशा प्रकारचे पुरोगाम्यांची दांभिकता येथेही दिसून येते.
वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर आणि त्यांच्या महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. त्यामुळे त्यांना त्यांची केशर-सफरचंदाची शेती आणि घरदार सोडून निर्वासित बनून देहलीमध्ये रहावे लागले. त्यांच्यावर आक्रमण करणारे मुसलमान असल्याने त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाने साहाय्य केले नाही. त्या वेळी मानवाधिकार, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, पोलीस यंत्रणा हे सगळे घटक आपापल्या ठिकाणी कार्यरत होते; परंतु काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला ना साधी प्रसिद्धी मिळाली, ना त्यांच्या मारेकर्यांना शिक्षा झाली. काश्मिरी हिंदू गेल्या ३० वर्षांपासून निर्वासितच आहेत. वाचकांना वाटेल की, आता ३७० आणि ३५-अ ही कलमे रहित झाली म्हणजे काश्मीरमध्ये सर्व आलबेल आहे. दुर्दैवाने म्हणावे लागते की, काश्मिरी हिंदू आजही काश्मिरातील त्यांच्या स्वतःच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. त्यांच्या नशिबी निर्वासित म्हणून रहाणे अजूनही कायम आहे. आपण स्वीकारलेली लोकशाही त्यांना न्याय देऊ शकलेली नाही.
दुर्दैवाने आपल्या देशात अत्याचार कुणावर झाले ? कुणी केले ? कोणत्या राजकीय पक्षांच्या कार्यकाळात झाले ? त्यावर प्रतिक्रिया अवलंबून असतात. आपल्याला हा दांभिकपणा पालटायचा आहे. यासाठी प्रभावी हिंदू संघटन आवश्यक आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु !’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात